एक दिन, एक साथ, एक तास स्वच्छता मोहीम

नवी मुंबई : ‘स्वच्छ भारत मिशन'च्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ‘स्वच्छता ही सेवा' अभियान अंतर्गत २५ सप्टेंबर रोजी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक दिवस, एक साथ, एक तास' सखोल स्वच्छता विशेष मोहीम महापालिकेच्या आठही विभाग कार्यालय क्षेत्रात ठिकठिकाणी लोकसहभागातून भव्य स्वरुपात राबविण्यात आली. यामध्ये २ लाखाहून अधिक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच २५ हजाराहून अधिक स्वच्छताप्रेमी नागरिक, अधिकारी, कर्मचारी यांनी एकात्म भावनेने सहभागी होत सदर मोहीम यशस्वी केली. या माध्यमातून नवी मुंबई स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी राहिल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे नवी मुंबईकर लहानथोर नागरिक शहर स्वच्छतेविषयी किती जागरुक आहेत, याचे मूर्तीमंत दर्शन नवी मुंबईतील अनेक ठिकाणी पहायला मिळाले.

पारसिक हिल, सीबीडी-बेलापूर येथे अपोलो हॉस्पिटलपासून टेकडीच्या माथ्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि डॉ.राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, उपायुक्त किसनराव पलांडे, डॉ.अजय गडदे, सोमनाथ पोटरे, संजय शिंदे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, ललिता बाबर, अभिलाषा म्हात्रे, ईटीसी केंद्र संचालक अनुराधा बाबर तसेच इतर अधिकारी, कर्मचारी, स्वच्छताकर्मी आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, मॉर्निंग वॉकर्स, स्वच्छताप्रेमी नागरिक, विविध महाविद्यालयांचे एनएसएस विद्यार्थी अशा ७५० हून अधिक नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत स्वच्छता मोहीम यशस्वी केली. यावेळी स्टर्लिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता आणि व्यसनमुक्ती याविषयी पलॅशमॉब आणि पथनाट्य सादर केले.

आठही विभाग कार्यालय क्षेत्रात विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या मोहिमांमध्ये तेथील सहा.आयुक्त तसेच स्वच्छता अधिकारी आणि विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वच्छताकर्मी आणि स्वच्छताप्रेमी नागरिक अशा १० हजाराहून अधिक जणांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले. याशिवाय महापालिकेच्या ८० आणि खाजगी ३०० हून अधिक शाळांतील २ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा जागर केला. त्याचप्रमाणे ‘नमुमंपा'ची ५ रुग्णालये, २६ नागरी आरोग्य केंद्रे आणि ५० हून अधिक खाजगी रुग्णालये येथील डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ आणि स्वच्छताकर्मी अशा ५००० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अंबरनाथमध्ये स्पीड ब्रेकर्सचा अतिरेक