नवी मुंबई महापालिका निवडणूक : यंत्र बिघाड, बोगस मतदार, आचारसंहिता भंग

नवी मुंबई  : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आज विविध प्रभागांमध्ये घडलेल्या गंभीर घटनांमुळे संपूर्ण मतदान प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मतदानाचा उत्सव लोकशाहीचा कणा मानला जातो, मात्र आज नवी मुंबईत अनेक ठिकाणी गोंधळ, आरोप–प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण करणाऱ्या घटना समोर आल्या.

नेरूळ विभागातील प्रभाग क्रमांक 28, बूथ क्रमांक 27 (भारतीय विद्यापीठ शाळा परिसर) या मतदान केंद्रावरील मतदान यंत्र तब्बल चार दिवसांपासून बंद असल्याची माहिती स्वतः रिटर्निंग ऑफिसरांनी दिली. तरीही आजपर्यंत ना मशीन बदलण्यात आले, ना कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली.

यामुळे मतदारांना तासन्‌तास ताटकळत राहावे लागले. काँग्रेसचे प्रवक्ते सैयद नासिर हुसैन यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत, “मतदारांचा घटनात्मक हक्क हिरावून घेतला जात आहे. हा निव्वळ निष्काळजीपणा नसून मतदान प्रक्रियेत जाणूनबुजून हस्तक्षेप तर नाही ना?” असा थेट सवाल उपस्थित केला. तसेच तात्काळ तोडगा न निघाल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, नेरूळ प्रभाग क्रमांक 23 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या कार्यकर्त्यांनी पाच बोगस मतदारांना पकडल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून यामुळे मतदार यादी व सुरक्षा व्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

वाशी प्रभाग क्रमांक 18 मध्ये भाजपाकडून मतदारांना उमेदवारांचे फोटो असलेले वोटिंग कार्ड वाटप केल्याचा आरोप अपक्ष व राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या उमेदवारांनी केला. हे कार्ड घेऊन मतदार थेट मतदान केंद्रात जात असल्याने हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप करत उमेदवारांनी मतदान केंद्राबाहेर जोरदार गोंधळ घातला. गोंधळानंतर पोलिसांनी मतदारांकडील स्लीप जमा करून घेतल्या.

या वेळी विजया कदम (अपक्ष) आणि अमोल मेहेत्रे (राष्ट्रवादी – शरद पवार गट) यांनी प्रशासनाला जाब विचारत तीव्र संताप व्यक्त केला.

याशिवाय काही प्रभागांमध्ये ‘नोटा’ बटण दाबल्यास भाजपला मत जात असल्याचा संशय व्यक्त केला गेला, मतदारांनी दाबलेल्या बटणाशेजारीच लाईट पेटली पाहिजे, याबाबत जनजागृती करण्याची मागणी उमेदवारांकडून होत होती. यामुळे ईव्हीएम यंत्रणेबाबतही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंत्र बिघाड, बोगस मतदार, आचारसंहिता भंगाचे आरोप आणि ईव्हीएमवरील संशय, या सर्व घटनांमुळे नवी मुंबईतील निवडणूक केवळ मतदानापुरती न राहता लोकशाही व्यवस्थेची मोठी कसोटी ठरताना दिसत आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मिरा-भाईंदरमध्ये गोंधळाच्या वातावरणात मतदान संपन्न