4 महिन्यांपासून पगाराला विलंब 

बदलापूर : कुळगाव बदलापूर नगर परिषदेत गेल्या चार महिन्यांपासून पगार वेळेवर होत नसल्याने कर्मचाऱ्यांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या लेखा विभागात ठिय्या मांडून पालिका प्रशासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. 

सोमवारी कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे युनिट अध्यक्ष विनोद वाल्मिकी यांच्या नेतृत्वाखाली कुळगाव बदलापूर नगर परिषदेत ठिय्या मांडला. दुपारी २.३० वा. च्या सुमारास विनोद वाल्मिकी व नगर परिषदेतील कर्मचारी वेळेवर पगार होत नसल्याबाबत जाब विचारण्यासाठी लेखा विभागात गेले. परंतु लेखा अधिकारी विकास चव्हाण हे दालनात नसल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी लेखा विभागात ठिय्या मांडला. पूर्वी आम्हाला दर महिन्याच्या एक तारखेला पगार मिळत होता. परंतु गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पगाराची तारीख लांबत चालली आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी गृहकर्ज घेतलेले आहे, तर अनेक कर्मचाऱ्यांनी घरातील दैनंदिन गरजेच्या वस्तू, मोबाईल आदी वस्तू कर्जावर घेतल्या आहेत. त्याचा ईएमआय दर महिन्याच्या एक, दोन तारखेला जात असतो. परंतु गेल्या चार महिन्यांपासून पगार या तारखेत होत नसल्याने कर्मचाऱ्यांचे ईएमआय बाऊन्स होऊन त्याचा आर्थिक भुर्दंड कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. ठेकेदारांच्या कामांच्या बिलांचे पेमेंट वेळच्यावेळी केले जाते, मग पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी नगर परिषदेकडे पैसे का नाहीत? असा सवाल विनोद वाल्मिकी यांनी उपस्थित केला. दरम्यान, विनोद वाल्मिकी यांनी लेखा अधिकारी विकास चव्हाण यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी शासनाचे अनुदान येण्यास विलंब होत असल्याने पगाराला विलंब झाला असल्याचे सांगितले. मात्र कर्मचाऱ्यांच्या सहा महिन्यांच्या पगाराची आगाऊ तरतूद केलेली असते, त्यामुळे त्याचा पगाराशी संबंध नसल्याचे सांगत यापुढे वेळेवर पगार न झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा विनोद वाल्मिकी यांनी दिला. दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अंबरनाथच्या नाट्यगृहाचा महाराष्ट्रदिनी पडदा उघडण्याचा मुहूर्त हुकला!