प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
विरोधी पक्षनेता अरविंद म्हात्रे यांची खारघरमध्ये पाहणी
खारघर : ‘विरोधी पक्षनेता जनतेच्या दारी' या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या थेट त्यांच्या दारात जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत खारघर प्रभाग क्रमांक-३ मधील सेक्टर-३४ आणि ३५ परिसरात भेट देत पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेता अरविंद म्हात्रे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या विविध अडचणी समजून घेतल्या. याप्रसंगी नगरसेवक हरेश केनी, तुषार पाटील, ‘शिवसेना'चे कैलास पाटील, नगरसेविका लीला कातकरी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. स्वप्नील पवार, आदि उपस्थित होते.
खारघर, सेक्टर-३० ते ३६ परिसर उंच इमारतींचा परिसर म्हणून ओळखला जातो. ‘सिडको'ने या भागात उद्यान, मैदानसाठी भूखंड राखीव ठेवले; मात्र विकसित केले नाही. तसेच या परिसरात अनेक वर्षांपासून पाणी समस्या आहे. स्थानिक रहिवाशांनी अनेकवेळा सिडको प्रशासनाकडे पत्रव्यवहार केले. मात्र, त्यांना आश्वासनापलिकडे काही मिळाले नाही.
दरम्यान, २७ मार्च रोजी महापालिकेचे विरोधी पक्षनेता अरविंद पाटील यांनी परिसरात भेट देवून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी ‘सिडको'कडून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. वसाहतीमधील रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतेचा अभाव, तसेच सार्वजनिक सुविधांशी संबंधित अनेक प्रश्न पाटील यांच्यासमोर मांडले. काही ठिकाणी नाल्यांची साफसफाई नियमित होत नसल्याने दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली. तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था आणि अपुरी प्रकाशव्यवस्था यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही रहिवाशांनी सांगितले.
नागरिकांच्या या सर्व समस्या ऐकून घेत विरोधी पक्षनेता अरविंद म्हात्रे यांनी संबंधित विभागांशी समन्वय साधून तातडीने सदर प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. जनतेच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करणे आपली प्राथमिक जबाबदारी आहे. प्रशासनाच्या माध्यमातून या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील, असे अरविंद पाटील यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी ‘महाविकास आघाडी'चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, सदर उपक्रमामुळे नागरिकांना त्यांच्या समस्यांसाठी थेट लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच अशा उपक्रमांमुळे स्थानिक पातळीवर प्रश्न सोडवण्यास गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
खारघर, सेक्टर-३४, ३५ मधील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात. तसेच परिसरातील पाणी समस्यासंदर्भात महापौर नितीन पाटील, महापालिका आयुक्त, सिडको अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच पाणी प्रश्न या विषयावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे.
-अरविंद पाटील, विरोधी पक्षनेता-पनवेल महापालिका.