३ वर्षानंतर भिवंडीतील प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार

भिवंडी : २०२६ मधील महापालिका सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले असून लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील राजकीय मैत्री बाजुला सारुन मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाने नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेने महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशातच भिवंडी महापालिकेची ३ वर्षांपासून रिकामी असलेली महापौर पदाची खुर्ची पदभार स्विकारणार आहे. त्यामुळे यावेळच्या भिवंडी महापालिका स्थापनेपासूनच्या ५ व्या सार्वत्रिक निवडणुकीत महापौर पदाचे रिकाने भरणार आहेत. त्यामुळे भिवंडी महापालिका प्रशासकीय राजवटीपासून मोकळा श्वास घेणार असून यामुळे भिवंडी शहराच्या सर्वांगीण विकासाची वाट मोकळी होणार असल्याचे मत शहरातील सजग नागरिकांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार १६ डिसेंबर २००१ मध्ये भिवंडी निजामपूर नगरपालिकाचे रुपांतर भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेत झाल्यानंतर प्रथमतः भिवंडी महापालिकेची निवडणूक मे २००२ यावर्षी पार पडली. त्यावेळी ‘काँग्रेस'चे सुरेश टावरे यांना भिवंडी महापालिकेच्या प्रथम महापौर पदाचा मान मिळाला होता. त्यांनी १३ जून २००२ ते १७ फेब्रुवारी २००५ पर्यंत महापौर पदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर १८ फेब्रुवारी २००५ ते १२ जून २००७ या अडीच वर्षांपर्यंत ‘कोणार्क विकास आघाडी'चे विलास पाटील यांनी महापौर पद सांभाळले. त्यानंतर १३ जून २००७ ते १४ डिसेंबर २००९ पर्यंत ‘काँग्रेस'चे जावेद गुलाम मो.दळवी यांनी कार्यभार सांभाळला. तर १५ डिसेंबर २००९ ते १० जून २०१२ या जवळपास तीन वर्षात ‘कोणार्क विकास आघाडी'च्या यशश्री राजन कडू यांनी महापौर पदाची धुरा सांभाळली.

दरम्यान, कडू यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर ११ जून २०१२ ते १० डिसेंबर २०१४ पर्यंत पती विलास पाटील यांच्या खंबीर पाठिंब्याने प्रतिभा विलास पाटील या २ वर्षांकरिता महापौर पदावर कार्यरत होत्या. त्यानंतर टेमघर येथील ‘शिवसेना'चे तुषार यशवंत चौधरी ११ डिसेंबर २०१४ ते ८ जून २०१७ दरम्यानच्या कालावधीत महापौर पदी विराजमान होते. मात्र, त्यानंतर पुन्हा प्रस्थापित म्हणून ‘काँग्रेस'चे जावेद दळवी यांनी ९ जून २०१७ ते ८ डिसेंबर २०१९ पावेतो महापौर पदाचे काम बघितले. त्यानंतर पुन्हा प्रस्थापितांची सत्ता म्हणून विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिभा पाटील यांची महापौर पदी वर्णी लागली होती. मात्र, कोरोना महामारीच्या काळानंतर ८ जून २०२२ रोजी प्रतिभा पाटील यांच्या महापौर पदाचा कार्यकाळ संपुष्टात येवून प्रशासक राजवट सुरु झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत महापालिकेची धुरा प्रशासक म्हणून आयुक्त सांभाळत आहेत. त्यामुळे जून २०२२ नंतर महापौर पदाची खुर्ची आयुक्तपदाच्या नावाखाली प्रशासकांच्या हाती येवून महापौर पदाची खुर्ची रिकामी आहे.

मात्र, २०२६ मध्ये महापौर पदाच्या खुर्चीची ३ वर्षांची प्रतिक्षा संपणार असून रिक्त पद भरणार असल्याने महापौर पदाची रिकामी खुर्ची पदभार स्विकारणार असल्याचे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलले जात आहे. त्यामुळे ८ वर्षानंतर होत असलेल्या या महापौर पदाच्या चुरशीच्या महापालिका निवडणुकीत लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांशी असलेली एकनिष्ठता आणि बांधिलकी झुगारुन आजी-माजी उमेदवार मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली वॉर्डातील प्रतिष्ठा जपण्यासाठी आघाडीत बिघाडी आणि युतीत त्रुटी या गणिताप्रमाणे मोर्चे बांधणीला लागल्याचे दिसून येत आहे.

भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत ‘काँग्रेस पक्ष'चे १८ नगरसेवक फुटल्याने ‘भाजप-कोणार्क विकास आघाडी'च्या प्रतिभा पाटील या विजयी झाल्या. तर उपमहापौर पदावर कोणार्क पुरस्कृत ‘काँग्रेस'चे नगरसेवक इम्रान खान निवडून आले. त्यामुळे सत्ताधारी ‘काँग्रेस-शिवसेना युती'ला जबरदस्त धक्का बसला होता.

भिवंडी महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ९० जागांपैकी ‘काँग्रेस'ने ४७ जागा मिळवून बहुमत संपादन केले. तर भाजपा २०, शिवसेना १२, कोणार्क आघाडी आणि रिपब्लिकन पक्षाने प्रत्येकी ४, समाजवादी पक्ष २ आणि एक अपक्ष असे नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे ‘काँग्रेस'ने २०१७ मध्ये ‘शिवसेना'च्या मदतीने महापौरपद मिळविले होते. त्याबदल्यात ‘काँग्रेस'ने ‘शिवसेना'ला उपमहापौर पद दिले होते. त्यामुळे भाजप आणि ‘कोणार्क विकास आघाडी'ला सत्तेपासून दूर रहावे लागले होते. याची सल ‘भाजप-कोणार्क विकास आघाडी'ला बसली होती. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत ‘भाजप-कोणार्क विकास आघाडी'ने ‘काँग्रेस'च्या १८ नगरसेवकांना फोडून महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

उरण नगराध्यक्षपदी ‘महाविकास आघाडी'च्या भावना घाणेकर