प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील २७ पदे रिक्त ; रुग्णांची हेळसांड
उरण : उरण तालुक्यातील आरोग्य विभागाची अतिशय दुर्दशा झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे उरण मधील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे.आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रच सलाईनवर गेले आहे. कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, आरोग्यसेविका आणि इतर कर्मचारी मिळून एकूण २७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उरण ग्रामीण भागातील हजारो गर्भवती महिला, नवजात बालकांची तपासणी आणि इतर कामांचा भार अवघ्या तीन आरोग्य सेविकांना पेलावा लागत आहे.
उरण तालुक्यातील दोन लाख लोकसंख्येला उरण येथील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आणि कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र एकमेव आधार आहे. उरण पूर्व भागातील सुमारे एक लाख गोरगरीब नागरिक उपचारासाठी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतात. मात्र, मागील आठवड्यात उदभवलेली पाणदिवे येथील डेंग्यूची साथ आटोक्यात आल्यानंतर आता कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र मधील अनेक उणिवा समोर आल्या आहेत.
कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ३ वैद्यकीय अधिकारी, २ महिला आरोग्य परिचारिका, २६ आरोग्य सेविका, २ शिपाई मिळून एकूण ३३ पदे मंजूर आहेत. यामध्ये आवश्यकता असलेल्या तीन सुरक्षा रक्षकांचा समावेश नाही. मात्र, यापैकी २ वैद्यकीय अधिकारी, १ महिला आरोग्य परिचारिका, २३ आरोग्य सेविका आणि २ शिपाई मिळून एकूण २७ पदे रिक्त आहेत.
कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्ण तपासणीचा भार केवळ तीन आरोग्य सेविकांवर असल्यामुळे कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेचा परिणाम रुग्णांवर होत आहे. रिक्त पदांमुळे कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेत उपचार होत नसल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याची बाब अनेकदा समोर आली आहे.रिक्त पदांमुळे आरोग्य केंद्रातील कामकाजावर परिणाम होत आहे.
राज्य शासनाकडे कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांबाबत यापूर्वीही पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, कर्मचारी भरती होत नाही. कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्याची मागणी दरमहा होणाऱ्या प्रत्येक बैठकीत केली जाते. - डॉ. वंदन कुमार पाटील, उरण तालुका आरोग्य अधिकारी - उरण.