नगरपालिकेच्या नवीन वास्तूवर संशयाचे सावट
अंबरनाथ : तब्बल ५० कोटी रुपये खर्च करुन उभारलेली अंबरनाथ नगरपालिकेची नवीन वास्तूमध्ये केवळ २ वर्षांतच सीलिंग कोसळणे, भिंतींना बुरशी लागणे आणि खिडक्या-दरवाजे तुटणे, लिपट नादुरुस्त होणे, यांसारख्या घटना घडत असून, नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असून नगरपालिकेने चौकशी सुरु केल्याची माहिती दिली आहे.
नगरपालिका प्रशासना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात बोरीवली मधील आरएनबी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. यांनी १६.८५ कोटी रुपयांचे काम केले. दुसऱ्या टप्प्यात १५.४० कोटी रुपये खर्च झाले. तर तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याचे काम पवईच्या रिंजिन कन्स्ट्रक्शन कंपनीकडे असून, त्यासाठी १८.०३ कोटी रुपयांचा अंदाज आहे.
इमारत टप्प्याटप्प्याने उभारल्याने खर्चात अनावश्यक वाढ झाली, असा नागरिकांचा आरोप आहे. संपूर्ण इमारत एकाच टप्प्यात का उभारली नाही? असा थेट सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. यामागे टेंडर प्रक्रियेत गैरव्यवहार आणि खर्च फुगवण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
‘लेबर फ्रंट युनियन'चे सचिव जगन्नाथ उगले यांनी या इमारतीला ‘भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण' अशी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. इमारतीला अद्याप कम्प्लिशन सर्टिफिकेट आणि स्ट्रक्चरल ऑडिट मिळालेले नाही. तरीदेखील नागरिकांना धोकादायक परिस्थितीत काम करावे लागत आहे. काही महिन्यांपूर्वी पहिल्या मजल्याचे पीओपी सीलिंग कोसळले होते. मात्र, तात्पुरत्या दुरुस्तीतून विषय झाकला गेला. सुरक्षिततेची खात्री नसताना वरच्या मजल्याचे बांधकाम सुरु ठेवणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ, असे उगले यांनी म्हटले आहे.
शहर अभियंता संजय कुंभार यांनी मान्य केले की, वरच्या मजल्याचे काम सुरु असल्यामुळे खालच्या मजल्यावरील काही पीओपीचे भाग खाली पडले होते. मात्र, इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतरच कम्प्लिशन सर्टिफिकेट आणि स्ट्रक्चरल ऑडिट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.