प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
नमुंमपा निवडणुकीसाठी सर्व यंत्रणेची सज्जता
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असून दाखल उमेदवारी नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया ३१ डिसेंबर रोजी पार पडली आहे. यापुढील काळात करावयाच्या निवडणूकविषयक कामकाजाचा आढावा महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी घेतला.
यावेळी निवडणुकीसाठी ‘राज्य निवडणूक आयोग'ने नियुक्त केलेले मुख्य निवडणूक निरीक्षक तथा ‘महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सर्व विभागांचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभाग अधिकारी यांना यापुढील कालावधीत करावयाच्या निवडणूकविषयक कामांबाबत मौलिक सूचना केल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि डॉ.राहुल गेठे, निवडणूक उपायुक्त भागवत डोईफोडे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा-वित्त अधिकारी सत्यवान उबाळे आणि निवडणूकविषयक विविध बाबींसाठी नियुक्त नोडल अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी निवडणूक चिन्ह नेमून देणे, अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्दी, मतपत्रिका छपाई, मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण, पहिल्या प्रशिक्षणाच्या दिवशीच त्यांना माहितीपुस्तिका देणे, मतदान अधिकारी यांच्या मतदान केंद्रनिहाय नेमणुका, ईव्हीएम मशीन हाताळणी प्रशिक्षण, मतदान साहित्याची मतदान केंद्रनिहाय उपलब्धता, स्ट्राँग रुम व्यवस्था अशा विविध बाबींबाबत मौलिक मार्गदर्शन केले. सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधी आणि उमेदवार यांना सर्व बाबींची नियमित माहिती देण्याचीही सूचना त्यांनी केली. मतमोजणी दुसऱ्याच दिवशी असल्याने त्यासाठी आवश्यक कर्मचारी यांच्या आत्तापासूनच नेमणूका करुन ठेवणे आणि त्यांना आवश्यक प्रशिक्षण देणे अशी कामे प्राधान्याने करावीत, असे त्यांनी सूचित केले.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निवडणूक केंद्र अधिकारीनिहाय आठही विभागांमधील कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. प्रत्येक विभागातील एकूण मतदान केंद्रे आणि तेथील व्यवस्था यांची माहिती घेताना तात्पुरत्या स्वरुपात बनविण्यात येणारी मतदान केंद्रे तसेच १ जानेवारी रोजी पडलेला पाऊस पाहता वॉटरप्रुफ करावीत, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
ईव्हीएम मशिनची अतिरिक्त व्यवस्था करुन ठेवावी. तसेच त्याची हाताळणी प्रशिक्षण मतदान कर्मचाऱ्यांप्रमाणेच राजकीय पक्षप्रतिनिधींनाही द्यावे, असे सूचित करण्यात आले. सर्व मतदान केंद्रे जीपीएस टॅगींग करावीत. तसेच मोठ्या संख्येने मतदान केंद्रे आहेत, अशा ठिकाणची पार्कींग व्यवस्था सक्षम असेल याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी बहुसदस्यीय प्रभागासाठी पहिल्यांदाच मतदान होणार असल्याने मतदान प्रक्रियेची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रचार-प्रसार वाढवावा. तसेच त्यासाठी विविध माध्यमांचा वापर करावा, अशाही सूचना आयुक्तांनी केल्या. जाहिरातींसाठी जागा उपलब्धता तसेच मैदान उपलब्धता याबाबत सर्वांना समान संधी असे तत्व काटेकोरपणे अंगिकारावी. तसेच जाहिरात फलकांवर जिओ टॅगींग पध्दत अंगिकारावी, असे आयुवतांकडून निर्देशित करण्यात आले. मतदारांना मतदान चि्ी्या वाटण्याचे काम आपल्या बीएलओ यांच्यामार्फत सुरु करावे, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या.
नवी मुंबईतील सर्व १०० टक्के मतदानकेंद्रे वेबकास्टींग असतील, त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना करतानाच मतदान केंद्रांच्या जागा पुरेशा कालावधीआधी ताब्यात घेण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाहीचे निर्देश आयुक्तांनी दिले. आपली सर्वच केंद्रे सीसीटिव्हीच्या देखरेखीखाली असून त्यामधील संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताबाबत पोलीस यंत्रणेशी समन्वय राखण्याच्या सूचना करण्यात आल्या. प्रत्येक विभागात मॉडेल पोलींग स्टेशन असतील ती उत्तम करण्याकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देशित करण्यात आले.
नवी मुंबई महापालिका निवडणूक सुरळीतपणे आणि पारदर्शक रितीने पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असून आत्तापर्यंतच्या सर्व टप्प्यांवर व्यवस्थित काम झाले आहे. यापुढील कामकाजही नियोजनबध्दरित्या करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
-डॉ. कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका.