प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधांसाठी महापालिका अंदाजपत्रकात तरतूद करणार - महापौर सुजाता पाटील
नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रात लागणाऱ्या सुख सुविधांसाठी नवी मुंबई महानगरपालिका येणाऱ्या अंदाजपत्रकात तरतूद करून सर्व प्रकारचे सहकार्य करीन असे आश्वासन नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी दिले. ज्येष्ठ नागरिक संघ सानपाडा आणि महावीर इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात मोफत आरोग्य शिबिर प्रसंगी महापौर बोलत होत्या.
ज्येष्ठांचा सन्मान व बालकांवर प्रेम करणे महत्त्वाचे आहे. ज्येष्ठांचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत. त्यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. अशा प्रकारची आरोग्य शिबिरे घेऊन ज्येष्ठांची सेवा करता, हे ज्येष्ठ नागरिक केंद्राचे उत्तम कार्य असल्याचेही त्यांनी सांगितले. उपमहापौर दशरथ भगत यावेळी म्हणाले की ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व सोयींनी युक्त असे चांगले विरंगुळा केंद्र असले पाहिजे. मुलांसाठी खेळाचे मैदानही असले पाहिजे आणि ज्येष्ठांसाठी उद्यानही असले पाहिजे, परंतु खेळाचा त्रास ज्येष्ठांना होणार नाही, याची काळजी आपण घेऊ. त्यासाठी लवकरच उद्यानात ज्येष्ठांच्या संरक्षणासाठी जाळी बसवण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी विरंगुळा केंद्रे कायमस्वरूपी करावीत, सिताराम मास्तर उद्यानात नाना नानी पार्क करावे, वरिष्ठ नागरिकांना खेळाच्या मैदानातील चेंडूपासून संरक्षण मिळावे, विरंगुळा केंद्राला सुख सुविधा मिळाव्यात्। वरिष्ठांना शासकीय योजना मिळण्यासाठी सहकार्य करावे, केंद्रात नवी मुंबई बस वाहतुकीचे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी सहकार्य करावे अशा मागण्या यावेळी मांडल्या. याप्रसंगी नगरसेवक भाऊ भापकर, शिल्पा ठाकूर, महावीर इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय संचालक डॉ. बळवंत चोरडिया, नवी मुंबईचे अध्यक्ष मनीष जैन, फेस्कॉनचे मुंबई आणि नवी मुंबईचे अध्यक्ष सुरेश पोटे आदी मान्यवरांनी शुभेच्छापर भाषणे केली. कार्यक्रमास नवी मुंबई रिटेल केमिस्ट अँड होलसेलर्स असोसिएशनचे अभंग, महावीर इंटरनॅशनलचे कमिटी मेंबर्स, सानपाडा जेष्ठ नागरिक संघाचे आजी माजी पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आरोग्य शिबिरात जवळजवळ १०० नागरिकांनी सहभाग घेतला.