शिवसेना-उबाठा आणि ‘मविआ'तील वाद चव्हाट्यावर

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे तसेच उध्दव आणि राज यांचे फोटो निवडणूक प्रचारात वापरले तर ‘निवडणूक आयोग'कडे तक्रार करु, असा इशारा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष) जिल्हा समन्वयक मनोज मयेकर यांनी थेट ‘काँग्रेस'चे मुजपफर हुसैन यांना दिल्यामुळे ‘महाविकास आघाडी'मधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

मिरा-भाईंदर ‘शिवसेना-उबाठा'चे जिल्हा समन्वयक मनोज मयेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे की, ‘महाविकास आघाडी'च्या घटक पक्षातील प्रमुख नेते ‘काँग्रेस'चे मुजपफर हुसेन यांनी काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनुसार, काँग्रेस पक्षाने मागणी केलेल्या जागांवरच अधिकृत उमेदवार दिले आहेत. त्यांनी सदरचे विधान पूर्णपणे चुकीचे केले आहे. आमच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. आम्ही मुजपफर हुसेन यांना चर्चेसाठी अनेकवेळा संपर्क केला होता. परंतु, त्यांनी आपण ‘काँग्रेस'चे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्याशी बोलून घ्या, असे सांगितले. त्यावर प्रमोद सामंत यांना संपर्क साधला असता त्यांनी अनेक दिवस फोनच उचलला नाही. त्यामुळे आम्ही मनसे सोबत चर्चा करुन जागावाटप आणि उमेदवारांची यादी निश्चित केली आहे, असे नमूद केले आहे.

त्याअनुषंगाने मनोज मयेकर यांनी इशारा दिला आहे की, यापुढे निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काँग्रेस अथवा ‘महाविकास आघाडी'ने वापरु नये. मिरा-भाईंदरमध्ये ‘काँग्रेस'च्या प्रचारात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे फोटो सुध्दा वापरले जात आहेत. त्यामुळे यापुढे त्यांनी फोटो वापरल्यास आपण ‘निवडणूक आयोग'ला तक्रार करणार असल्याचे मयेकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महाविकास आघाडी आणि शिवसेना उबाठा पक्ष यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पनवेल महापालिका निवडणुकीच्या रिंगणात १६ वकील