ठाणे शहरात धावणार डबल डेकर बस

 

ठाणेः ठाणेकरांचे गेल्या अनेक वर्षांचे ‘डबल डेकर' बसचे स्वप्न सत्यात उतरत आहे. महापालिका मुख्यालय येथे परिवहन सेवेच्या डबलडेकर बसचा शुभारंभ आज महाराष्ट्र दिनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

‘ठामपा'तर्फे १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन समारंभ सकाळी ७.१५ वाजता साजरा करण्यात येणार आहे. महापालिका भवन येथे  महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या राष्ट्रध्वजारोहण आणि ध्वजवंदन करण्यात येणार आहे. त्यानंतर ‘डबल डेकर बस'चा शुभारंभ कार्यक्रम पार पडणार आहे.

मुंबईच्या धर्तीवर आता ठाणे शहरातही पहिली वातानुकूलित डबल डेकर बस धावणार आहेत. यानंतर पुढील १५ ते २० दिवसात १० डबल डेकर बसेस टप्प्याटप्प्याने तापयात येतील. या बसची तांत्रिक चाचणी ठाणेतील रस्त्यांवर घेण्यात आली होती. सुरुवातीला या बसेस तीन हात नाका ते घोडबंदर (गायमुख), शिळफाटा (दत्त मंदिर) ते डोंबिवली (एंट्री पॉईंट) आणि पारसिक नगर (मुंब्रा वळणरस्ता) ते कळवा (शिवाजीनगर) या मार्गावर धावणार आहेत.

ठाणे महापालिकाने एकूण १० वातानुकूलित डबल डेकर बस खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना या बस प्रवासात विशेष सवलती देण्याचा विचार सुरु आहे. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी आणि वाढती गर्दी लक्षात घेता, ‘डबल डेकर बस'चा निर्णय ठाणेकरांसाठी मोठा दिलासा ठरेल. केवळ डबल डेकरच नाही, तर दिवाळीपर्यंत ‘ठाणे परिवहन'च्या तापयात १०० नवीन सीएनजी आणि १०० इलेक्ट्रिक बसेस देखील दाखल होणार आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘मिसिंग लिंक'चा आज लोकार्पण सोहळा