प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
ना. रामदास आठवले यांच्याकडून ‘रिपाईर्'साठी १५ जागांची मागणी
उल्हासनगर : केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) चे अध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाई या पक्षांच्या ‘महायुती'ने एकत्र येऊन लढा द्यावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना केली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. परंतु, उल्हासनगरमध्ये मात्र महायुती व्हावी, असा आग्रह ना. आठवले यांनी धरला आहे.
७ डिसेंबर रोजी रात्री उल्हासनगर येथील गोल मैदान या ठिकाणी ‘आरपीआयर्'चे शहर अध्यक्ष नाना बागुल यांनी पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता, यावेळी ना. रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी सदर सूचना केली. रिपाई पक्षाला आगामी महापालिका निवडणुकीत किमान १५ जागा मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. तसेच महायुती एकत्रितपणे निवडणूक लढल्यास उल्हासनगर महापालिकामध्ये निश्चितपणे ‘महायुती'चा महापौर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नामदार आठवले यांनी उल्हासनगर शहराच्या सामाजिक भूमिकेवर यावेळी प्रकाश टाकला. राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करतानाच, आठवले यांनी कोकणच्या जगप्रसिध्द हापूस आंब्याच्या दर्जाचा मुद्दाही उपस्थित केला. कोकणचा हापूस आंबा नंबर एकचा असेल आणि त्याला मिळालेला एक नंबरचा दर्जा कलंकित होता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
रामदास आठवले यांनी काँग्रेस पक्षाकडून वारंवार केल्या जाणाऱ्या ‘संविधान धोक्यात आहे' या प्रचारावरही टीका केली. तो ‘काँग्रेस'चा अपप्रचार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान आजही मजबूत आणि सुरक्षित आहे, असे ठामपणे आठवले म्हणाले.
याप्रसंगी रिपाई नेते नाना बागुल, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार कुमार आयलानी, शिवसेना महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, महेश गायकवाड, अरुण आशान, भाजप शहराध्यक्ष राजेश वधारिया, रिपाई नेते शांताराम निकम, नाना पवार, आदि उपस्थित होते.