पनवेल महापालिका ‘महायुती'च्या गटनेतेपदी नितीन पाटील

पनवेल : पनवेल महापालिका सार्वत्रिक-२०२६ निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या ‘महायुती'ने दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले. या निवडणुकीत ‘भाजप महायुती'च्या एकूण ५९ उमेदवारांनी विजय मिळवत पुन्हा एकदा पनवेल महापालिकेवर सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. या पार्श्वभूमीवर २५ जानेवारी रोजी नवनिर्वाचित नगरसेवकांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत ‘महायुती'च्या गटनेतेपदी नितीन जयराम पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली.

या बैठकीस ‘भाजपा'चे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, ‘राष्ट्रवादी काँग्रेस'चे कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड. प्रकाश बिनेदार यांच्यासह ‘महायुती'चे सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनी गटनेते नितीन पाटील यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ‘भाजपा'चे ५५, ‘शिंदे सेना'चे २ आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस'चे २ असे एकूण ५९ उमेदवार विजयी झाले आहेत. जनतेने ‘महायुती'वर दाखवलेल्या विश्वासामुळे विकासाभिमुख आणि स्थिर प्रशासनासाठी पुन्हा एकदा ‘भाजपा महायुती'ला कौल मिळाल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.

दरम्यान, ‘महायुती'च्या गटनेतेपदी नितीन पाटील यांची निवड झाल्यानंतर २८ जानेवारी रोजी कोकण आयुक्त कार्यालयात ‘महायुती'ची अधिकृत गट नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदांसाठी १० फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नाईकांचे विधान, नवी मुंबईत राजकीय 'वाकयुध्द'