प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
अखेर वाशी-तुर्भे लिंक रोडवरील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला सुरुवात
तुर्भे : अखेर १ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वाशी-तुर्भे लिंक रोडवरील उड्डाणपुलाची दुरुस्ती करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामासाठी १२ कोटी रुपये खर्च होणार आहे.
तुर्भे येथील नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम (एनएमएमटी) बस डेपो समोर वाशी-तुर्भे मार्गाला जोडणारा उड्डाणपुल सिडको तर्फे बांधण्यात आला असून, या उड्डाणपुलाचे नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरण करण्यात आले आहे.
२०२४ मधील पावसाळ्यात तुर्भे सेक्टर-२१ कडून ठाणे-बेलापूर रस्त्यावर तुर्भे स्टेशनकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या मार्गिकेतील स्पॅनमधील साईडचा कॅन्टीलिव्हर भाग काही प्रमाणात तुटला होता. तेव्हापासून सदर मार्गिका सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करण्यात आली आहे. संरचना कन्सल्टन्ट यांच्यामार्फत या उड्डाणपुलाची पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार संरचना कन्सल्टंट यांच्याकडून सदर उड्डाणपुलाच्या स्पॅनचा संरचना आणि स्थिरता अहवाल प्राप्त करुन पुढील अत्यावश्यक दुरुस्ती नवी मुंबई महापालिका मार्फत त्वरित हाती घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले होते.
या कामाला विलंब झाल्याने वाशी किंवा तुर्भे गाव आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना ठाणे-बेलापूर रस्त्याकडे येण्यासाठी सानपाडा स्टेशनमार्गे ठाणे-बेलापूर मार्ग गाठावा लागत आहे. त्यासाठी नागरिकांचा वेळ आणि पैसा देखील अधिक खर्च होत आहे. उड्डाणपुलाच्या दुरुस्ती कामासाठी निविदा प्रक्रिया पार पडल्याने लवकरच काम सुरु होऊन पावसाळ्यापूर्वी उड्डाणपुलाची एक मार्गिका पूर्ववत सुरु होणार असल्याचे नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, लालफितीच्या कारभारामुळे या कामाला विलंब झाला होता. अखेर १ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वाशी-तुर्भे लिंक रोडवरील उड्डाणपुलाची दुरुस्ती करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.