बनावट मद्य वाहतुकीवर कारवाई; ३.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

पनवेल : नाताळ आणि नवीन वर्षांच्या पार्श्वभूमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात राज्य उत्पादन शुल्क, पनवेल ग्रामीण विभागाने कारवाई करून चारचाकी गाडीसह एकूण ३.३८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, संचालक (अंमलबजावणी-दक्षता) प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त (कोकण विभाग, ठाणे) प्रदीप पवार, अधीक्षक (रायगड-अलिबाग) रविकिरण कोले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पनवेल ग्रामीण विभाग यांनी तळोजा पोलिस स्टेशन हद्दीत शिवम अपार्टमेंट, सेक्टर-१६, फेज-२, घोटगाव रोडवर तळोजा येथे दारुबंदी गुन्ह्याकामी सापळा रचून चारचाकी वाहनामधून बनावट विदेशी मद्याच्या वेगवेगळ्या ब्रँडच्या १४४ बाटल्या आणि वाहन असा एकूण २.५८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आरोपी जयवंत भोईर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर मद्याबाबत चौकशी केली असता त्याने सदरचे मद्य जवळच असलेल्या प्लॅटमधून (किंवा 'पॅलेट' मधून) आणले असे सांगितले. त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन छापा टाकून बनावट विदेशी मद्याच्या वेगवेगळ्या ब्रँडच्या ८० हजार रुपये किंमतीच्या २५० बाटल्या जप्त केल्या. सदर दोन्ही ठिकाणी मिळून एकूण ३.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त करून जयवंत भोईर याला अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक (पनवेल ग्रामीण) अनिल बिराजदार, दुय्यम निरीक्षक बीट क्र. १ अजित बडदे, दुय्यम निरीक्षक बीट क्र. ३ सुरेश झगडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गैनिनाथ पालवे, जवान-वाहन चालक सचिन कदम, जवान ऋषिकेश भोगे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश