बायो-मेडिकल कचरा प्रकल्पाविरोधात जनक्षोभ

अंबरनाथ : शहरातील पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या प्रस्तावित ‘बायो-मेडिकल कचरा' प्रकल्पाविरोधात अंबरनाथकरांनी आता रणशिंग फुंकले आहे. २५ मार्च रोजी सायंकाळी पूर्व भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेत हजारो नागरिकांनी आपला रोष नोंदवत, प्रशासनाला या प्रकल्पाबाबत गंभीर इशारा दिला. आरोग्य आणि पर्यावरणाशी तडजोड कदापि मान्य नाही, असा स्पष्ट संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.

मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर येथील कचरा प्रकल्प अंबरनाथमधील जांभिवली (फेज-४) भागात स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरु झाल्यापासून शहरात संतापाची लाट आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत यासंदर्भात माहिती दिल्यानंतर, या लढ्याला अधिक धार चढली आहे. २६ मार्च रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत पार पडलेल्या स्वाक्षरी मोहिमेत तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर, वकील आणि व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी एका सुरात या घातक प्रकल्पाला विरोध दर्शवला.

या जनआंदोलनाचे नेतृत्व ‘अंबरनाथ बचाव संयुक्त कृती समिती'चे अध्यक्ष तथा शिवसेना (ठाकरे गट) कल्याण उपजिल्हाप्रमुख अनिल लक्ष्मण भोईर करत आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि संघटीत प्रयत्नांमुळे सदर लढा आता अधिक व्यापक झाला असून, नागरिकांनी त्यांच्या कामाचे विशेष कौतुक केले आहे. एमआयडीसी क्षेत्रातील भूखंड क्रमांक जेबी-३३ वर  'SMS Envoclean Private Limited'  या कंपनीचे काम सुरु असल्याचे समजताच नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

सदर प्रकल्प झाल्यास हवा आणि पाण्याचे प्ररुषण वाढून पुढील पिढीच्या आरोग्यावर त्याचे भीषण परिणाम होतील. जर प्रशासनाने लोकांच्या या भावनांची वेळीच दखल घेतली नाही आणि प्रकल्पाचा निर्णय मागे घेतला नाही, तर भविष्यात रस्ते अडवून अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ‘कृती समिती'चे अनिकेत गायकवाड आणि संतप्त नागरिकांनी दिला आहे. अंबरनाथच्या अस्तित्वासाठी सुरु झालेला सदर लढा आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘ट्रॅफिक रायडर्स' ठरले देवदूत