म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
नरेंद्र पाटील यांना विधान परिषदवर संधी द्या
नवी मुंबई : ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'चे सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना ‘भाजपा'च्या वतीने ‘महाराष्ट्र विधान परिषद'वर काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी एपीएमसी मधील माथाडी भवन येथे झालेल्या माथाडी कार्यकर्त्यांच्या बैठकीत एकमुखाने करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने मागणीचे निवेदन देण्यासाठी ‘भाजपा'चे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांना माथाडी कामगारांचे शिष्टमंडळ पार्टी कार्यालयात भेटणार आहे.
‘महाराष्ट्र विधान परिषद'मधील ५ सदस्यांच्या रिवत जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे माजी आमदार नरेंद्र पाटील यांना ‘भाजपा'च्या वतीने ‘विधान परिषद'वर घेण्याची मागणी करण्यासाठी ‘माथाडी कामगार युनियन'ची एपीएमसी मधील माथाडी भवन येथे बैठक झाली. या बैठकीस ‘युनियन'चे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख तसेच इतर पदाधिकारी आणि विविध व्यवसायातील माथाडी बोर्डाच्या टोळ्यांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
शासनाच्या ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ'च्या अध्यक्षपदावरुन नरेंद्र पाटील यांनी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे आणि तालुक्यांचे दौरे करुन १ लाख पेक्षा जास्त मराठा उद्योजक करण्याचा विक्रम केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांची ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ समजून घेतलेली आहे. ते माथाडी कामगारांना न्याय देत आहेत, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देखील माथाडी कामगार चळवळीचे विशाल स्वरुप ज्ञात आहे. त्यामुळे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना ‘विधान परिषद'वर काम करण्याची संधी ‘भाजपा'कडून दिली जाईल, असा विश्वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.