प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
अंबरनाथमधील मुख्य रस्त्यांवर फेरीवाल्यांचा विळखा
अंबरनाथ : अंबरनाथ शहरात मुख्य रस्त्यांवरील फेरीवाल्यांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पदपथ आणि रस्त्यांच्या कडेला असलेल्या अनधिकृत व्यवसायांमुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून, वाहन चालकांना अनेकदा वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. त्यातच दर सोमवारी भरणारा ‘सोमवार बाजार' या समस्येत अधिकच भर टाकत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
शहरातील पश्चिम भागातील मुख्य रस्ते सध्या फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडले आहेत. रस्त्यांचा बराचसा भाग या अतिक्रमणांनी व्यापल्यामुळे वाहनांच्या येण्या-जाण्यासाठी अत्यंत कमी जागा उरली आहे. या परिस्थितीमुळे सामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून, प्रशासनाने रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.
एरवी अस्तित्वात असलेल्या अतिक्रमणांव्यतिरिक्त, अंबरनाथ पश्चिम येथील रेल्वे स्थानक ते नगरपरिषद या रस्त्यावर सोमवारी भरणाऱ्या बाजारामुळे परिस्थिती हाताबाहेर जाते. या दिवशी विक्रेते चक्क रस्त्याच्या मध्यभागापर्यंत दुकाने थाटत असल्याने मुख्य चौक आणि रस्त्यांवर प्रचंड गर्दी होते. यामुळे केवळ स्थानिक वाहतूकच नव्हे, तर आपत्कालीन सेवांनाही या भागातून मार्ग काढणे जिकरीचे ठरते. फेरीवाल्यांसाठी हक्काचा 'फेरीवाला झोन' नसल्याने सदर परिस्थिती ओढवल्याचे सांगितले जात आहे.
फेरीवाला झोनबाबत सातत्याने मागणी होऊनही गेल्या अनेक वर्षांत ठोस तोडगा निघालेला नाही. अनधिकृत बाजार आणि रस्त्यावरील दुकानदारांवर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा सूर उमटत आहे. या अनधिकृत बाजारामुळे होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी तातडीने लक्ष घालून रस्ते अतिक्रमणमुक्त करावेत, अशी अपेक्षा अंबरनाथकर व्यक्त करीत आहेत.
या संदर्भात अतिक्रमण विरोधी पथकप्रमुख यांना विचारले असता ते म्हणाले की, अंबरनाथ रेल्वे स्टेशन ते नगरपरिषद रस्त्यावर वेळोवेळी कारवाई होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर सोमवार बाजार भरत असता. सदर बाजार बंद करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.