ऐरोली मधील ८० अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त
ऐरोली : नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभाग तर्फे नोटीस देण्यात येऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरुध्द नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, महापालिका अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे आणि उप आयुक्त (अतिक्रमण) भागवत डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका अतिक्रमण विभाग तर्फे ऐरोली विभागात बेकायद बांधकामे निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली अंतर्गत ऐरोली सेक्टर-१९ मधील युरो स्कुल समोरील भुखंड क्रमांक-७३ वरील कांदळवनात असलेले टिप टॉप फास्ट फुड कॉर्नर/ फालुदा चौक, स्नानगृह आणि मंगल शौचालयाचे अनधिकृत बांधकाम ९ मे रोजी महापालिका अतिक्रमण विभाग तर्फे निष्कासित करण्यात आले.
याशिवाय महापालिका अतिक्रमण विभाग तर्फे ऐरोली सेक्टर-१९ मधील भुखंड क्रमांक-७४ वरील कांदळवनात उभारण्यात आलेल्या ८० अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्यात आली.
या धडक मोहिमवेळी महापालिका ऐरोली विभाग सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी सुनिल काठोळे, उप अभियंता (प्रभारी) रोहित ठाकरे, कनिष्ठ अभियंता संदिप म्हात्रे यांच्यासह इतर महापालिका अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
सदर अनधिकृत बांधकामे ३ जेसीबी, २ डंपर, १ पोकलन, १५ मजूर यांच्या सहाय्याने हटविण्यात आली. या कारवाईवेळी ऐरोली पोलीस स्टेशन मधील १५० पोलीस अधिकारी-कर्मचारी यांचा बंदोबस्त होता.
दरम्यान, महापालिका अतिक्रमण विभाग मार्फत यापुढे देखील अनधिकृत झोपड्या निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे यांनी सांगितले.