होळी-रंगपंचमीचा पर्यावरणस्नेही जल्लोष करा

उल्हासनगर : ‘रंगोत्सव'चा जल्लोष साजरा करताना निसर्गाची हानी होणार नाही, याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे आणि पर्यावरण विभागाने शहरवासयांना यंदाची होळी आणि धुलीवंदन (रंगपंचमी) पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे करण्याचे आवाहन केले आहे.

उच्च न्यायालयामधील जनहित याचिका (क्र. १५५/२०११) अंतर्गत दिलेल्या निर्देशानुसार देशभरातील नागरिकांना पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली असून, जलसंधारण, वृक्षसंवर्धन तसेच प्रदुषणमुक्त वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.

महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे आणि उपायुक्त (पर्यावरण) विशाखा मोटघरे यांनी नागरिकांना उद्देशून पर्यावरणाचा समतोल राखण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. आपण परंपरा आणि संस्कृतीचे पालन करत असताना निसर्गाची हानी होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. त्यामुळे आपण सर्वजण पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संकल्प करुया, असे आवाहन केले आहे.

होळी-रंगपंचमी ‘निसर्गस्नेही' करण्याचा संकल्प...
सदर जनजागृती मोहिमेस शहरातील अनेक सामाजिक संस्था आणि पर्यावरण प्रेमींनी पाठिंबा दर्शवला आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे आणि प्रदुषणविरहित उत्सव साजरा करुन एक जबाबदार नागरिक असल्याचा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्वांनीच आपल्या पुढील पिढ्यांसाठी शुध्द हवा, स्वच्छ पाणी आणि हरित पर्यावरणाचा वारसा जपायला हवा. यासाठीच यंदाची होळी आणि रंगपंचमी ‘निसर्गस्नेही' करण्याचा संकल्प करुया!

पर्यावरण संवर्धन प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सण-उत्सवांचे महत्त्व कायम राखत, त्यांचा आनंद घेताना निसर्गाच्या संतुलनाची काळजी घेणे आवश्यक आहे. यंदाची होळी आणि रंगपंचमी पर्यावरणपूरक पध्दतीने साजरी करण्यासाठी महापालिका नागरिकांसोबत आहे. वृक्षतोड, पाण्याचा अपव्यय आणि प्रदूषण टाळून जबाबदारीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
-मनीषा आव्हाळे, आयुक्त-उल्हासनगर महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

१०८ रुग्णवाहिकेची पुन्हा दिरंगाई