जेसीबीच्या निष्काळजीपणामुळे २२ केव्ही लाईन ठप्प

 

कल्याण : टिटवाळा परिसरातील बल्याणी गावात सुरू असलेल्या गटार सफाईच्या कामादरम्यान गंभीर निष्काळजीपणामुळे मोठा बिघाड घडला आहे. जेसीबी मशीनद्वारे खोदकाम करताना थेट २२ केव्ही उच्चदाब वीजवाहिनीची केबल

तुटल्याने १ एप्रिल रोजी दुपारपासून अनेक भागांतील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. याचवेळी केडीएमसीच्या पाण्याच्या मुख्य पाइपलाइनलाही तडा गेल्याने नागरिकांवर दुहेरी संकट कोसळले आहे.

याचा फटका रवींद्र आर्केड, रवींद्र रेजन्सी, इंदिरानगर, बल्याणी गाव, मोहिली, टेकडी परिसर, तलाव परिसर, गणेश नगर सोसायटी, आंबेडकर चौक तसेच आंबिवली रोड परिसरावर बसला असून संपूर्ण भाग अंधारात बुडाला आहे. अचानक वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. महावितरणच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले असले तरी उच्चदाब २२ केव्ही लाईनची दुरुस्ती ही जटिल प्रक्रिया असल्याने वीजपुरवठा पूर्ववत होण्यास वेळ लागणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठीही काही कालावधी लागू शकतो.

दरम्यान, अशा प्रकारच्या कामांमध्ये सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे वारंवार नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची नाराजी स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे. संबंधित कंत्राटदार व यंत्रणांवर जबाबदारी निश्चित करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तीन आठवड्यांपासून उघड्यावर संसार थाटलेल्या नागरीकांचा अंबरनाथ नगर परिषदेवर मोर्चा