म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
नवी मुंबई महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे घणसोली मनपा शाळेतील विद्यार्थ्याचा शालेय सहली दरम्यान मृत्यू ...
दोषी शिक्षण उपायुक्त व शिक्षण अधिकारी यांचे तात्काळ निलंबन करून गुन्हा दाखल करावा ... गजानन काळे यांची मागणी
नवी मुंबई : २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने विविध पालिका शाळांच्या किमान २३०० विद्यार्थ्यांना घेवून खोपोली येथील इमॅजिका पार्क येथे सहल नेण्यात आली होती. यावेळी घणसोली शाळा क्र. ७६ येथील हिंदी माध्यमातील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या आयुष सिंग वय वर्ष १४ या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदरच्या घटनेला नवी मुंबई मनपाचे शिक्षण उपायुक्त, शिक्षणाधिकारी तसेच संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व कंत्राटदार जबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या संदर्भात न्याय मागण्यासाठी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेतली. तसेच दोषी शिक्षण उपायुक्त, शिक्षणाधिकारी यांचे निलंबन करण्याची मागणी केली. परंतु आयुक्त हे दोषी अधिकाऱ्यांना वाचवत असल्याचे दिसून येत होते. चौकशी समितीचे गाजर दाखवून मा आयुक्त विषय गुंडाळण्याचा प्रयत्न करत होते. एका मुलाचा पालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे मृत्यू झालेला असताना ही आयुक्त असंवेदनशील असल्याचे दिसून येत होते. आयुक्तांच्या अशा वर्तवणुकीवर तीव्र आक्षेप घेत मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्त कार्यालयाबाहेर तब्बल 2 तास ठिय्या आंदोलन केले.
संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबन झालेच पाहिजे" अशा घोषणा मनसे पदाधिकाऱ्यांनी देवून आयुक्तांचा निषेध केला.
महाराष्ट्र शासनाच्या २० मे २०१७ च्या शासन निर्णयाप्रमाणे शाळांना इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयाचे ज्ञान मिळावे भौगोलिक, सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष पहावयास मिळाव्यात अशाच ठिकाणी शैक्षणिक सहल काढण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. यासाठी शिक्षण उपसंचालकांना प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. परंतु शासनाचे हे सर्व नियम पायदळी तुडवून नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण उपायुक्त, शिक्षणाधिकारी, संबंधित मुख्याध्यापक व कंत्राटदार शिक्षक यांनी इमॅजिका या ऍडव्हेंचर पार्क येथे सहलीचे नियोजन केले. उन्हाचा पारा चढलेला असताना, या ऍडव्हेंचर पार्क मधील राईड या अतिभव्य असताना व या राईड १८ वर्षांवरील मुलांसाठी असताना देखील येथे सहल नेण्याचा हट्टाहास पालिका अधिकाऱ्यांनी का केला असा प्रश्न उपस्थित होतो. शिक्षण उपसंचालक पुणे यांनी २ फेब्रुवारी २०१६ रोजी एक परिपत्रक काढून सहलीचे नियोजन कुठे व कसे करावे याबाबत इत्यंभूत सूचना दिलेल्या आहेत. सदर परिपत्रकामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की १० विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक असावा, साहसी खेळ, वॉटर पार्क, ऍडव्हेंचर पार्क असलेल्या ठिकाणी सहली काढण्यात येऊ नयेत. असे असताना देखील मनपाच्या शिक्षण विभागाने सुमारे तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांना इमॅजिका या ऍडव्हेंचर पार्क या ठिकाणी सहलीला का घेऊन गेले असा प्रश्न उपस्थित होतो. या सहलीची कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया न राबवता थेट अंदाजे २ कोटी रुपयांचे कंत्राट एका विशिष्ट मर्जीतील व्यक्तीला देण्यात आले, यावरूनच शिक्षण उपायुक्त, शिक्षणाधिकारी यांचा सहली मागच्या हेतुवर शंका उपस्थित होते.
सदर घटने संबंधी आयुक्तांना खालील मागण्या मनसे तर्फे करण्यात आल्या. पण, एक ही मागणी तात्काळ मान्य न करण्याची संवेदना आयुक्तांनी न दाखवल्याने मनसे येत्या काही दिवसांत पालिके विरुध्द तीव्र आंदोलन करेल. तसेच न्यायालयाचे दरवाजे ठोठावून जनहित याचिका दाखल करेल, असा इशारा गजानन काळे यांनी दिला.
मनसेच्या या आंदोलनात मनसे शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सह सचिव अभिजीत देसाई, महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, पालिका सेना शहर अध्यक्ष अप्पासाहेब कौठुळे, रस्ते आस्थापना शहर संघटक संदीप गलुगडे, रोजगार सेना शहर अध्यक्ष सनप्रीत तूर्मेकर, चित्रपट सेना शहर संघटक अनिकेत पाटील, महिला सेना उप शहर अध्यक्ष अनिथा नायडू, दीपाली ढवुळ, यशोदा खेडस्कर, मनसे इतर पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.