आदिवासी पाड्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई

भिवंडी : ग्रुप ग्रामपंचायत खंबाळा हद्दीतील आदिवासी पाड्यात ठेकेदाराच्या आडमुठे धोरणामुळे आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत असल्याने ग्रामपंचायत कमिटी आणि ग्रामस्थांनी एकमताने ठराव मंजूर करुन ठेकेदारावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन पडघा पोलीस प्रशासनास सादर केले आहे.

त्यानुसार खंबाळा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत खंबाळा, कुशीवली,पाली, किरवली-राऊतपाडा आदि गावे समाविष्ट आहेत. यामध्ये खंबाळा येथील आदिवासी पाड्यात पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्यात आली आहे. परंतु, अंबाडी-वासिंद रस्त्याचे काम करणारे निर्मल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.चे ठेकेदार सम्पूर्ण नंद पांडे यांनी सदर पाईप लाईन खंबाळा ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात न घेताच मे २०२५ मध्ये तोडून टाकल्याने आदिवासी पाड्यातील पाणीपुरवठा खंडीत झाल्याचे निवेदनात नमूद केले आहे. तसेच याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने ठेकेदार सम्पूर्ण पांडे यांना संपर्क करुन विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आदिवासींना पिण्याच्या पाण्याचा खर्च ग्रामपंचायत मार्फत करण्यात आल्याने ग्रामपंचायतीवर याचा अतिरिक्त भार पडला आहे.

त्यानंतर ठेकेदारावर कारवाईसाठी ‘श्रमजीवी संघटना'चे विश्वनाथ पसारी यांनी आंदोलन केले असून पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज नोंदणीकरिता सरपंच नंदा वाघे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वाघे, लॉयर कैलास यशवंत जाधव यांच्या प्रयत्नातून आदिवासींना हक्काच्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात अनुसूचित जाती जमातीवर अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायत तर्फे पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नो-पार्किंग'मधील पोलिसांच्या वाहनांवर कारवाई