पनवेल महापालिका निवडणुकीच्या रिंगणात १६ वकील

पनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीत कायद्याची पदवी घेतलेले आणि प्रत्यक्ष वकिली व्यवसाय करणारे तब्बल १६ वकिल उमेदवार विविध पॅनलमधून निवडणूक रिंगणात उत्तरले आहेत. त्यामुळे भविष्यात पनवेल महापालिकेत कायदेशीर जाण असलल्या लोक प्रतिनिधींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यंदाच्या निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक-१७. या प्रभागात तब्बल ४ वकील थेट आमने-सामने असून त्यांचा प्रचार अधिक तर्कशुध्द, मुद्देसूद आणि कायदेशीर भाषेत सुरु असल्याचे चित्र आहे. या प्रभागात ‘पनवेल बार असोसिएशन'चे माजी अध्यक्ष ॲड. मनोज भुजबळ, माजी नगराध्यक्ष सुनील घरत यांची कन्या ॲड. शिवानी घरत, ‘भाजपा'कडून ॲड. प्रकाश बिनेदार तसेच कपबशी चिन्हावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे ॲड. जयसिंग शेरे यांचा समावेश आहे. कामोठे परिसरातील प्रभाग क्रमांक-१२ मध्ये ‘शेकापे'कडून ॲड. सिध्दार्थ सोनाजी इंगळे (शिट्टी चिन्ह) यांनी ‘भाजपा'चे उमेदवार प्रभाकर कांबळे यांना थेट आव्हान दिले आहे. याच प्रभागात ॲड. सुलक्षणा जगदाळे हेलिकॉप्टर चिन्हावर अपक्ष म्हणून मैदानात उतरल्या आहेत. त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘शिवसेना'च्या महिला महानगर संघटनेत सक्रिय होत्या. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष लढत देण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रभाग क्रमांक-६ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेवर ‘भाजपा'कडून माजी नगरसेवक अँड. नरेश ठाकूर निवडणूक लढवत असून, महापालिकेतील अनुभव आणि कायदेशीर पार्श्वभूमी असे त्यांचे प्रमुख भांडवल आहे. याच प्रभागात सर्वसाधारण महिला गटातून ॲड. गीता सुशील चौधरी सफरचंद चिन्हावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक-७ मध्ये ‘जिल्हा परिषद'च्या माजी सदस्या अनिता पाटील आणि ज्येष्ठ नेते आत्माराम पाटील यांची कन्या ॲड. विणा पाटील मैदानात असून, त्या नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करीत आहेत. प्रभाग क्रमांक-८ मध्ये ‘राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष'चे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांचे पुत्र ॲड. तुषार पाटील तुतारी चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. याशिवाय प्रभाग क्रमांक-९ मधून ‘भाजपा'च्या ॲड. प्रतिभा सुभाष भोईर, प्रभाग क्र.११ मधून ॲड. समाधान काशीद, प्रभाग क्र. १३ मधून अपक्ष ॲड. संतोष गाडी, तसेच प्रभाग क्र.१८ आणि १९ मधून अनुक्रमे ॲड. सिध्दार्थ गावकर आणि ॲड. राहुल कासारे असे वकील उमेदवार रिंगणात आहेत.

यंदा मतदार केवळ पक्षनिष्ठा न पाहता उमेदवाराची अभ्यासू मांडणी, प्रश्नांची समज, प्रशासनावरील पकड आणि कायदेशीर स्पष्टता या बाबींनाही महत्त्व देत आहेत. त्यामुळे प्रचारात मांडले जाणारे युवतीवाद आणि विकासाच्या ठोस योजना मतदारांवर कितपत प्रभाव टाकतात? याचा फैसला १६ जानेवारी रोजी निकालाच्या रुपाने समोर येणार आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

विरोधकांकडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम - कपिल पाटील