टुथब्रश-टमरेल घेऊन नागरिकाचे आयुक्त कार्यालयात आंदोलन
कल्याण : कल्याण पूर्व सूचक नाका परिसरातील ‘केडीएमसी'च्या शौचालायची दूरवस्था झाली आहे. २५ शौचालये आहेत; मात्र त्यातील फक्त एक शौचालय सुरु आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. सकाळी कामावर जाण्याची घाई आणि त्यात शौचालय देखील नाही. जे शौचालय आहे त्याची देखील दूरवस्था झाली आहे. मात्र, महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने सामाजिक कार्यकर्ते मनोज वाघमारे यांनी महापालिकेच्या ड प्रभागात अनेक वेळा तक्रार करून सुद्धा लक्ष देत नसल्याने २७ सप्टेंबर रोजी वाघमारे यांनी महापालिका मुख्यालयात आयुक्त कार्यालयाबाहेर टुथब्रश आणि टमरेल घेऊन आंदोलन केले.
यावेळी वाघमारे यांना सुरक्षा रक्षकांनी आडवले. केडीएमसी स्मार्ट सिटी मध्ये येत असून कल्याणमध्ये शौचालयांची दूरवस्था आहे. हीच या शहरासाठी शरमेची बाब असल्याने नागरिकांमधून संताप वेक्त केला जात असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.