ना. गणेश नाईक यांच्या सुवर्णमहोत्सवी कार्याचा गौरव

 

नवी मुंबई : वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतपर आयोजित केलेल्या विविधांगी १०१ सेवाभावी सामाजिक उपक्रमांच्या पंधरवडा अंतर्गत कार्यक्रमांचा समारोप आणि ना. गणेश नाईक यांच्या सुवर्णवर्षे अविरत कार्याच्या गौरव वाशी मधील सिडकोचएक्झिबिशन सेंटर सभागृहात संपन्न झाला.

याप्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी नगरसेवक संपत शेवाळे, प्रभाकर भोईर, शशिकांत राऊत, माजी नगरसेविका अंजली वाळुंज, दयावती शेवाळे, लता मढवी, फशीबाई भगत, वैजयंती भगत, रुपाली भगत आदि आदि उपस्थित होते.

या अनोख्या जनसेवेप्रती सुवर्णवर्षपूर्तीच्या गौरव समारंभात बोलताना नामदार नाईक यांनी संयमाने पण बेधडक शैलीत चौफेर फटकेबाजी केली. कल्याण (ग्रामीण) क्षेत्रातील १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट प्रकरण, मोरबे आणि बारवी धरण पाणी प्रश्न, नवी मुंबई शहरात सिडकोकृत वसाहतींमध्ये उभे राहिलेले गृह प्रकल्प, पुनर्विकासासाठी लहरी पध्दतीने वाटप झालेले चटई क्षेत्र यामुळे शहर नियोजनाच्या बाबतीत कोलमडत चाललेली व्यवस्था, महापालिका प्रशासकांनी संपवलेल्या महापालिकेच्या मुदतठेवी आणि आगामी महापालिका निवडणूक प्रभाग रचना यावर संताप व्यक्त केला. 

नवी मुंबईकरांच्या भविष्यातील जलसमृध्दीसाठी कर्जत तालुक्यातील पोशिर धरणातून ५०० एमएलडी पाणी घेण्याचे प्रयत्न सुरु असून त्यासाठी महापालिकेला अंदाजे ४ हजार कोटी रुपये मोजावे लागतील, असे ना. नाईक यांनी सांगितले. 

आगामी काळात नवी मुंबई महापालिकेवर भाजपाचीच सत्ता येणार आणि नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार असा ठाम विश्वास देखील नाईक यांनी बोलून दाखवला. आगामी काळात अथवा निवडणुकीवेळी मतदारांनी सावध राहण्याच्या आणि कोणत्याही आमिष, भुलथापांना बळी न पडण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

कार्यक्रमाचे आयोजक दशरथ भगत यांनी आपल्या मनोगतात ना. गणेश नाईक यांच्या आजवरच्या सामाजिक, राजकीय कारकिर्दीचा धावता आढावा सादर केला. मोरबे धरण खरेदी आणि त्याची उपयुक्तता सांगता या धरणाला श्रीगणेश सरोवर असे नाव द्यावे आणि परिसर तिर्थक्षेत्र असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, यावेळी सामाजिक पंधरवडा उपक्रमातील माहिती-छायाचित्र स्मरणीकिचे प्रकाशन ना. गणेश नाईक यांच्या हस्ते झाले. तसेच वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या १०० हुन अधिक ज्येष्ठ नागरिकांची धान्याने तुला करुन सन्मान करण्यात आली. सदर अन्नधान्य सामाजिक संस्था आणि गरजवंताना वाटप करणार असल्याचे उपक्रमाचे संयोजक निशांत भगत आणि संदीप भगत यांनी सांगितले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सुरज पाटील यांची खासदार नरेश म्हस्के यांच्यावर टीका