ठाणेतील ‘प्रॉपर्टी प्रदर्शन'मध्ये २३४ घरांची नोंदणी
ठाणे : ‘क्रेडाई-एमसीएचआय'तर्फे बाळकुम येथील दोस्ती वेस्ट काऊंटीमध्ये सुरू असलेल्या २३ व्या ‘प्रॉपर्टी प्रदर्शन'चा १९ एप्रिल रोजी समारोप झाला. गेल्या तीन दिवसात ‘प्रॉपर्टी प्रदर्शन'ला ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्हा आणि मुंबई उपनगरातील २०,४६७ नागरिकांनी भेट दिली असून, २३४ नागरिकांनी आपल्या स्वप्नातील घराची नोंदणी केली. या प्रदर्शनात ३९८ कोटी रुपयांचे कर्जप्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. या प्रतिसादाबद्दल अध्यक्ष सचिन मिराणी, सचिव फैय्याज विराणी आणि ‘प्रदर्शन समिती'चे अध्यक्ष विभव बोरकर यांनी ग्राहकांचे आभार मानले आहेत.
या प्रदर्शनात ठाण्यातील ४० हून अधिक आघाडीच्या विकसकांचे १०० हून अधिक रेरा-मान्यताप्राप्त गृहप्रकल्प सादर करण्यात आले होते. त्यात ५५ लाख रुपयांच्या १ बीएचके पासून प्रीमियम दर्जाच्या ४ बीएचके प्रशस्त निवासस्थानांचा समावेश होता. या प्रदर्शनात घोडबंदर रोड, कोलशेत, पोखरण आणि माजिवडा येथील मालमत्तांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. जुन्या ठाणे शहरातील पुनर्विकासाच्या मालमत्तेतही ग्राहकांनी औत्सूक्य दाखविले. किमान ५५ लाख ते २ कोटी २५ लाखांपर्यंतच्या घरांना सर्वाधिक मागणी आढळली. काही वैशिष्ट्यपूर्ण ऑफर्समुळे अनेक ग्राहकांनी घरांची थेट नोंदणी केली. या प्रदर्शनात स्टेट बँक, युनियन बँकेसह काही बँका आणि वित्तसंस्थांची दालने होती.
घरखरेदीचे स्वप्न साकार करण्यासाठी पहिल्यांदाच प्रदर्शनात आलेल्या अनेक कुटुंबांचे घर खरेदीचे स्वप्न साकार झाले. त्यासाठी प्रदर्शनातील विधी आणि वास्तुविषयक मार्गदर्शन करणाऱ्या दालनांचीही ग्राहकांना मदत झाली. तर शेकडो कुटुंबांनी प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी जाऊन सुविधांची माहिती घेतली. या कुटुंबाकडून लवकरच घरखरेदी होण्याची अपेक्षा आहे. ठाणे शहरातील नियोजित ठाणे-बोरिवली बोगदा, मेट्रो, कोस्टल रोड आणि बुलेट ट्रेनच्या स्थानकाच्या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनाला अनिवासी भारतीय आणि गुंतवणूकदारांकडूनही लक्षणीय प्रतिसाद मिळाला.
मुंबई महानगर क्षेत्रात सर्वाधिक निवासी घरे आणि व्यावसायिक मालमत्तांची विक्री ठाणे शहरात होते. ठाणे शहरात पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या असून, त्याचा नागरिकांना लाभ होत आहे. सांस्कृतिकदृष्ट्या समृध्द ठाणे शहरात उत्तम जीवनशैली आहे. त्यामुळे ठाणे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील आदर्श शहर म्हणून उदयाला आले आहे, असा विश्वास व्यक्त करीत अध्यक्ष सचिन मिराणी यांनी ‘प्रॉपर्टी प्रदर्शन'ला भेट देणाऱ्या नागरिकांचे आभार मानले. महारेरा मान्यताप्राप्त प्रकल्प आणि विश्वासार्ह विकासकांमुळे घरखरेदीला प्रतिसाद मिळाला, असे सचिन मिराणी यांनी स्पष्ट केले.
प्रॉपर्टी प्रदर्शनात समावेश असलेले पारदर्शक गृहप्रकल्प, विविध सोयिस्कर पर्याय आणि कर्जपुरवठ्याच्या सुविधेमुळे ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, अशी प्रतिक्रिया सचिव फैय्याज विराणी यांनी दिली. या प्रदर्शनाच्या यशाबद्दल ग्राहकांबरोबरच विकसक आणि बँकेचे प्रतिनिधींचे आभारी असून, यापुढील काळातही ‘क्रेडाई-एमसीएचआय'च्या माध्यमातून ग्राहकांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी कार्यरत राहू, असे ते म्हणाले.
अमृता राव यांचे जलअभियान सुरु...
‘क्रेडाई-एमसीएचआय'च्या प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी आयोजित परिसंवादात अभिनेत्री अमृता राव यांची मुलाखत समाजसेवक आदित्य चौहान यांनी घेतली. त्यावेळी ठाणे शहरात पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी अभिनेत्री अमृता राव यांनी सुरु केलेल्या ‘जलहित में जारी' अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. ठाणे महापालिकेबरोबर समन्वयाने अभियान राबविले जाणार असून, त्यासाठी ‘क्रेडाई एमसीएचआय'ने पुढाकार घ्यावा, असे आवाहन अमृता राव यांनी केले.
सर्वप्रथम प्रत्येक नवीन घरात प्रत्येक नळाला शॉवर असलेले टॅप बसवावेत. तसेच जुन्या सोसायट्यांनीही सोसायटीच्या मेंटेनन्समधून शॉवर बसविल्यास पाणीबचत होऊ शकेल. नव्या गृहसंकुलांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारल्यास टंचाईच्या काळात पावसाचे पाणी घरगुती वापरासाठी उपलब्ध होईल, अशी सूचना अमृता राव यांनी केली.