‘नमुंमपा'च्या ‘शिक्षण रुपांतरण धोरण'ला हायकोर्टात आव्हान

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वादग्रस्त ‘शिक्षण रुपांतरण धोरण-२०२६' वरुन आता राजकीय आणि कायदेशीर युध्द पेटले आहे. भाजप नगरसेवकाने मांडलेल्या या धोरणाविरोधात शिवसेना उपनेते तथा विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, या धोरणास स्थगिती देण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीची गळचेपी शिवसेना कदापि खपवून घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत चौगुले यांनी प्रसंगी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

विजय चौगुले यांनी ‘द ज्युरीस पार्टनर्स लॉ फर्म'च्या माध्यमातून रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेत चौगुले यांनी गंभीर दावे केले आहेत. यात विषय क्र.१३ आणि प्रस्तावित शिक्षण धोरण भारतीय राज्यघटनेतील कलम १४, १९(१)(अ) आणि २१ अंतर्गत दिलेल्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारे आहे. सदर विषय मनमानी, बेकायदेशीर आणि महापालिकेच्या अधिकाराबाहेरचा असल्याचा दावा करण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाने या संदर्भातील सर्व अभिलेख मागवून घेऊन विषय क्र.१३ पूर्णपणे रद्द आणि बाद करावा. याचिकेचा अंतिम निकाल लागेपर्यंत या धोरणाच्या अंमलबजावणीवर तातडीने स्थगिती द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

या धोरणानुसार केजी पासून इंग्रजी माध्यमाची अंमलबजावणी, शिक्षकांचे संक्रमण तसेच नवीन शैक्षणिक रचना आणि प्रणालीमध्ये मूलभूत बदल प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे महापालिका शिक्षण व्यवस्थेवर तसेच लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर थेट परिणाम होणार आहे. अशा प्रकारचे धोरण केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांच्या मर्यादेशी निगडीत असल्यामुळे व्यापक, संवैधानिक आणि धोरणात्मक विचार होणे आवश्यक आहे. सदर धोरणामुळे विद्यमान शिक्षण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्ताची शवयता आहे. मराठी माध्यमाचे संंभाव्य दुर्लक्ष, विद्यमान शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना, शैक्षणिक गुणवत्तेवर तात्काळ परिणाम तसेच पालक-विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शवयता आहे. या सर्व बाबींचा पुरेसा विचार न करता धोरणाची तातडीने अंमलबजावणी करणे नैसर्गिक न्यायाच्या तत्वांना बाधक ठरेल.

मराठी भाषा, अस्मिता आणि संस्कृतीची गळचेपी शिवसेना कदापि होऊ देणार नाही. त्याच्या रक्षणासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ. भाजपा नगरसेवकाने ठरावाच्या सुचनेद्वारे मांडलेले धोरण जर प्रशासकीय ठरावाच्या माध्यमातून लादण्याचा प्रयत्न केला, तर शिवसेना तीव्र जनआंदोलन छेडेल. तसेच या धोरणाविरोधात वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपोषणाला बसण्याची आमची तयारी आहे.
-विजय चौगुले, उपनेते शिवसेना तथा विरोधी पक्षनेते, नमुंमपा.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे