ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
नवी मुंबई : अशोक विजयादशमी या पावन दिवशी ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील तथागत भगवान गौतम बुध्द पुतळ्यासमोर ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन'चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित सर्व अनुयायांनी भगवान गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन त्यांच्या चरणी नतमस्तक होत सामाजिक समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा पुन्हा एकदा संकल्प केला.
धम्मचक्र प्रवर्तन दिन केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक क्रांतीचा दिवस आहे.१९५६ साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह याच दिवशी बौध्द धम्माची दीक्षा घेत लाखो समाजबांधवांना नवसंजीवनी दिली होती. त्यांचे विचार आजही समाजाच्या प्रगतीस दिशा देणारे आहेत. त्याअनुषंगाने नेरुळ मधील ‘ज्वेल नवी मुंबई' येथे उभारण्यात आलेले तथागत गौतम बुध्द स्मारक केवळ एक स्मारक नसून समाजातील समता, करुणा आणि मैत्रीच्या मूल्यांचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी आ. मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेविका अनिता शेट्टी, नवी मुंबई आरपीआय जिल्हाध्यक्ष (आठवले गट) महेश खरे, विकास सोरटे, रविंद्र सावंत, राम झेंडे, भाजपा नेरुळ (पश्चिम) मंडळ अध्यक्ष भास्कर यमगर, राजू तिकोने, दत्ता घंगाळे, भालचंद्र वाडकर, अरविंद थोरात, मंगल घरत, प्रताप भोस्कर, महेंद्र नाईक, मकरंद म्हात्रे, हितेश गामी, शंतनू भोपी तसेच नवी मुंबईतील विविध बौध्द विहारांमधील भंते, नागरिक, महिला, आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.