विरोधकांकडून मोदींना विरोध करताना देशालाच विरोध - खा. ज्योतीताई वाघमारे

ठाणे : जगातील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण जग तिसऱ्या महायुध्दाच्या उंबरठ्यावर उभे असल्याचे चित्र दिसत आहे. अशावेळी देश म्हणून एकसंघ असल्याचा संदेश जगाला देणे आवश्यक आहे. मात्र, देशातील काही विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करताना देशालाच विरोध करीत असल्याचा टोला नवनिर्वाचित राज्यसभा खासदार तथा ‘शिवसेना शिंदे गट'च्या प्रववत्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी लगावला.

राज्यसभा खासदारकीचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर १२ मार्च रोजी खा. ज्योती वाघमारे ठाणे येथील टेंभी नाक्यावरील आनंद आश्रम येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी महापालिका मुख्यालय जाऊन महापौर शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी ज्योतीताई वाघमारे यांचा सत्कार केला. यावेळी गटनेते पवन कदम, नगरसेवक सिध्दार्थ ओलेकर, ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, सचिव मनीष जोशी, आदि उपस्थित होते. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खा. वाघमारे यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले.

एका सामान्य शिवसैनिकाला ‘राज्यसभा'मध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मी आनंद आश्रमात आल्याचे खा. ज्योतीताई वाघमारे यांनी सांगितले.

सध्या जगभरात युध्दाचे वातावरण निर्माण झाले असून त्याचे परिणाम सर्व देशांवर होत आहेत. युध्दामुळे विविध क्षेत्रांवर परिणाम होत असला तरी महाराष्ट्र सरकार नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. लाडक्या बहिणींना कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

शिवसेना कोणाची याबाबत जनतेनेच निकाल दिला असल्याचे सांगत खा. ज्योतीताई वाघमारे यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून ‘शिवसेना'ला ७ खासदार मिळाले, तर विधानसभा निवडणुकीत ‘महायुती'ला २३२ जागा मिळाल्या. त्यामुळे जनतेने आपला कौल स्पष्ट दिला आहे. मात्र, तरीही काही नेत्यांना सदर निकाल मान्य होत नसल्याची टीका त्यांनी केली.

‘निवडणूक आयोग'नेही निर्णय दिला असून जनतेनेही आपला निकाल दिला आहे. त्यामुळे अजुनही शंका घेणाऱ्यांनी वास्तव स्वीकारावे, असा टोला खा. वाघमारे यांनी यावेळी लगावला. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

उल्हासनगरमधील थकीत करदात्यांना सवलत