गुन्हे शाखा कक्ष-३ तर्फे १२२ मोबाईल फोन फिर्यादींना परत    

पनवेल : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या आणि गहाळ झालेल्या तब्बल २५ लाख रुपये किंमतीच्या १२२ मोबाईल फोनचा शोध घेऊन सदर मोबाईल फोन सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) अजयकुमार लांडगे यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना परत केले आहेत. दरम्यान, हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करुन त्यांचे आभार मानले.  

गहाळ झालेल्या मोबाइल फोनचा शोध घेण्याकरिता केंद्र सरकारने सीईआयआर (सेंट्रल इक्वीपमेंट आयडेंटीटी रजिस्टर) असे पोर्टल कार्यान्वित केले आहे. सदर पोर्टलचा वापर करुन नागरिकांच्या हरवलेल्या मोबाइल फोनचा शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते आणि त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन नांद्रे, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, माधव इंगळे आणि अंमलदारांनी विशेष मोहिम राबविण्यात आली होती.    

या शोध मोहिमेत युनिट-३ च्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करुन नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतून चोरीस गेलेल्या आणि गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा सीईआयआर पोर्टलवरुन आढावा घेऊन त्या मोबाईल फोनचा शोध घेतला. तसेच सीईआयआर पोर्टलचा वापर करुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास केला. या तपासात अनेक मोबाइल फोन भारतातील इतर राज्यात आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये वापरात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.      

त्यानंतर देखील गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने अथक प्रयत्न करुन काही ठिकाणी स्थानिक पोलिसांची मदत घेवून एकूण १२२ नागरिकांचे चोरीला गेलेले आणि गहाळ झालेले सुमारे २५ लाख रुपये किंमतीचे मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. तसेच संबंधित फोन मालकांना सदरचे मोबाईल फोन परत केले आहेत. हरवलेला मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त करुन पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ऑडी कारनंतर आता दुचाकी खाडीत कोसळली