प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
नमुंमपा सर्व विभागांच्या कामकाजाचा आयुक्तांकडून आढावा
नवी मुंबई : नुकतीच पार पडलेली नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक शांततेने आणि सुव्यवस्थित पध्दतीने पार पडली असून यामध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी अतिशय चांगले योगदान दिले असल्याचे अधोरेखित करीत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सद्यस्थितीत सुरु असलेल्या महापालिकेच्या विविध प्रकल्प आणि सुविधा कामांचा विभागनिहाय आढावा घेतला.
महापालिका मुख्यालयातील विशेष समिती सभागृहात सर्व विभागांच्या आढावा बैठकीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा-वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, प्रशासन विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे आणि इतर विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
नवी मुंबई महापालिकेचा सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करताना आगामी आर्थिक वर्षात करावयाच्या नियोजित सुविधा संकल्पांविषयी माहिती जाहीर करण्यात आली होती. त्या संकल्पांपैकी किती सुविधांची पूर्तता झाली, तसेच प्रगतीपथावर असलेल्या सुविधांची सद्यस्थिती काय आहे? याची विभागनिहाय माहिती आयुक्तांनी संबधित विभागप्रमुखांकडून घेतली.
नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्तांचा सविस्तर आढावा घेताना सद्यस्थितीत पूर्ण असलेल्या इमारतींचा सुविधा कामांसाठी वापर सुरु करावा. सुविधांसाठी आवश्यक जागांकरिता संबंधित विभागांनी मालमत्ता विभागाशी संपर्क साधून त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तांची पाहणी करावी आणि आपल्या सुविधांसाठी योग्य असलेल्या मालमत्ता ताब्यात घेऊन वापरात आणण्याची तत्पर कार्यवाही करावी. यामध्ये सर्व विभागातील बांधून तयार असलेल्या मार्केट इमारतींचे जागा वाटप करुन त्या उपयोगात आणण्याची कार्यवाही तत्परतेने करावी, असे आयुक्त शिंदे यांनी सूचित केले.
मार्जिनल स्पेस, पदपथ याठिकाणी असलेली अतिक्रमणे आणि विनापरवानगी सुरु असलेल्या व्यवसायांवरील कारवाईचा वेग वाढवावा. पर्यावरणाचे महत्व लक्षात घेऊन प्लास्टिक प्रतिबंधाची कार्यवाही तीव्र करावी. विभागांमध्ये नियमितपणे प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमा सुरुच ठेवाव्यात. निर्मितीच्या ठिकाणापासून म्हणजे घरापासूनच कचरा वर्गीकरणाचे प्रमाण वाढविण्यावर भर देण्यासाठी लोकांमध्ये व्यापक स्वरुपातील जागरुकता कृती आराखडा तयार करुन तो अंमलात आणावा. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्याचा कालावधी कमी करावा आणि नागरिकांना तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीची माहिती मिळण्यासाठी अधिक काळजीपूर्वक कार्यवाही करावी, असेही निर्देश आयुवतांनी बैठकीत दिले.
मैदाने आणि मोकळया जागा भाड्याने दिल्यानंतर वापरकर्त्याकडून कार्यक्रम झाल्यानंतर तेथील स्वच्छता केली जाणे आवश्यक आहे. मात्र, त्याबाबत वापरकर्त्याकडून दक्षता घेतली जात नाही, अशा तक्रारी जागरुक नागरिकांकडून प्राप्त होताना दिसतात. याबाबत विभाग कार्यालयांनी सतर्क राहून परवानगी देतानाच वापरकर्त्यांना याबाबत माहिती द्यावी आणि त्यांनी स्वच्छता न केल्यास त्यांच्या अनामत रक्कमेतून स्वच्छतेसाठी आलेल्या खर्चाची कपात करावी, असेही सूचित करण्यात आले. स्वच्छ-सुंदर शहर अशी आपल्या नवी मुंबईची ओळख असून यामध्ये स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे कार्यक्रमानंतर तेथील स्वच्छता आयोजकांची जबाबदारी असल्याची जाणीव त्यांना करुन देत दंडात्मक कार्यवाही करावी, अशाही सूचना देण्यात आल्या.
जगभरातील सध्याचे वातावरणातील वाढते प्रदूषण बघता यापुढील काळात स्मशानभूमीही सीएनजी गॅस अथवा वीजेवर चालणाऱ्या असणे काळाची गरज आहे. त्यादृष्टीने नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील २९ स्मशानभूमींमध्ये टप्प्याटप्प्याने गॅस, विद्युत शवदाहिनी करण्याची कार्यवाही करावी. तसेच याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावे, अशाही सूचना आयुक्त कैलास शिंदे यांनी केल्या.
नवी मुंबई महापालिका नागरिकांना सोयीचे होईल. त्यांच्या श्रम, मूल्य आणि वेळेत बचत होईल यादृष्टीने ऑनलाईन सेवा पुरविण्यावर भर देत असून महापालिकामार्फत ६८ लोकसेवांसह आणखी ४९ सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. देयक भरण्याच्या सर्व ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे नागरिक ८२९१९२०५०४ या व्हॉटस्ॲप चॅट बॉटवरुनही सहजपणे सेवांचा लाभ घेऊ शकतात. त्या अनुषंगाने सर्व विभागांनी आपल्याशी संबधित सेवांची पूर्तता विहित कालावधीत करण्यासाठी कटीबध्द रहावे.
नागरिकांना मालमत्ता कर, पाणीपट्टी भरण्यासाठी फोन पे, जीपे यासह आरटीजीएस तसेच सर्व प्रकारच्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. त्या सुविधांचा लाभ नागरिक महापालिकेच्या कोणत्याही कार्यालयात न जाता घरबसल्या घेऊ शकतात. तसेच त्यांना व्यवहाराची ऑनलाईन पावतीही मिळू शकते. अद्यापही नागरिक मोठ्या प्रमाणात महापालिका कार्यालयात जाऊन देयक अदा करणे पसंत करतात. वास्तविकतः ऑनलाईन देयक रक्कम अदा करणे पारदर्शक आणि जलद कामकाजाच्या दृष्टीने नागरिकांना सोयीचे असून याबाबत नागरिकांपर्यंत अधिक व्यापक स्वरुपात माहिती पोहोचवून त्यांच्यामध्ये ऑनलाईन देयक अदा करण्याची सवय निर्माण करण्यासाठी जनजागृती करावी.
-डॉ. कैलास शिंदे, आयुक्त - नवी मुंबई महापालिका.