पक्ष प्रवेशावरुन भाजप-शिवसेना पुन्हा आमने-सामने

कल्याण : एकेमकांचे ‘पक्ष फोडाफोडी'वरुन शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये तापलेले वातावरण वरिष्ठ पातळीवर झालेल्या समझोत्यावरुन शांत झालेले असतानाच याच मुद्द्यावर पुन्हा एकदा कल्याणात सदर दोन्ही पक्ष समोरासमोर आले आहेत. यावेळी त्यांच्यातील नाराजीला निमित्त ठरले आहेत, ते अरुण गीध. माजी नगरसेवक अरुण गीध आणि त्यांच्या भगिनी वंदना गीध यांनी १५ डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘शिवसेना'मध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याचा अलिखित करार झालेला असतानाही गीध यांचा प्रवेश कसा काय करुन घेतला? असा सवाल कल्याण पश्चिमेतील माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे.

काही आठवड्यांपूर्वी एकमेकांचे पक्ष फोडण्याच्या मुद्द्यावरुन संपूर्ण राज्यभरामध्ये शिवसेना आणि भाजपा मधील वातावरण चांगलेच तापले होते, ज्याचे पडसाद थेट दिल्लीमध्येही उमटलेले दिसून आले. त्यानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांचे पदाधिकारी आणि नगरसेवक कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय राज्य पातळीवर घेण्यात आल्यानंतर ताणले गेलेले संबंध निवळले होते. मात्र, सदरचा शमलेला वाद आता पुन्हा सुरु होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण पश्चिमेतील वरिष्ठ नगरसेवक अरुण गीध आणि त्यांच्या भगिनी वंदना गीध ‘शिवसेना'मध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत माहितीही दिली आहे.

मात्र, गीध बंधू-भगिनींच्या या शिवसेना पक्षप्रवेशानंतर ‘भाजपा'कडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण पश्चिमेतील माजी आमदार नरेंद्र पवार यांनी याबाबत प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधत ‘शिवसेना'च्या या दुहेरी भूमिकेबाबत विरोध व्यक्त केला आहे. एकेमकांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते न घेण्याचा अलिखित करार दोन्ही पक्षांमध्ये झाल्याची आठवणही पवार यांनी यावेळी करुन दिली आहे. तसेच आमच्याकडेही ‘शिवसेना'चे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरचे अनेक नगरसेवक प्रवेश घेण्यासाठी रांगेत उभे आहेत. ‘शिवसेना'कडून अशाप्रकारे पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले जाणार असेल तर आम्हालाही मग आमची भूमिका बदलावी लागेल, अशा तीव्र शब्दांत नरेंद्र पवार यांनी ‘शिवसेना'ला आव्हान दिले आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

निवडणूक विषयक कामकाजाचा नमुंमपा आयुवतांकडून आढावा