सकाळ सिटी हेल्थ रन मॅरेथॉननिमित्त पामबिच मार्गावरील वाहतुकीत बदल
नवी मुंबई: सकाळ मीडिया ग्रुप प्रा. लि. यांच्या वतीने नवी मुंबई तील पाम बीच मार्गावर आज रविवार दि २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळ सिटी हेल्थ रन मॅरेथॉन २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे पामबिच मार्गावरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. वाहतुकीतल हा बदल पहाटे २ ते सकाळी १० वाजेपर्यंत राहणार आहे. अशी माहिती सीवूड वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहिनी लोखंडे यांनी दिली.
वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार बेलापुरकडून वाशी/मुंबई/ठाणे च्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मोराज सर्कलपर्यंत प्रवेश बंद राहणार आहे. या कालावधीत वाशी ते बेलापुर वाहीनीवर वाहनांची वाहतूक वळविण्यात येणार असून, त्या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू राहणार आहे. या कालावधीत वाहतूक नियंत्रण विभागाने नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी मार्गही जाहीर केले आहेत.
१. वाशीहून किल्ला जंक्शनकडे आणि किल्ला जंक्शनहून वाशीमार्गे जाणारी वाहने ही मोराज सर्कलपासून बेलापुरकडे जाणाऱ्या वाहीनीवरील एकाच लेनवरून वळवली जातील.
२. तसेच, सायन-पनवेल हायवे उरण फाटा मार्गेही वाहने इच्छित स्थळी पोहोचू शकतील.
या वाहतूक निर्बंधांचा पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका तसेच इतर अत्यावश्यक सेवांतील वाहनांवर परिणाम होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ सिटी हेल्थ रन मॅरेथॉन २०२५ स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी पामबीच मार्गावरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी या कालावधीत सहकार्य करावे. असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी केले आहे.