महापालिका तर्फे नागरिकांसाठी स्मार्ट तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित
भिवंडी : भिवंडी- निजामपूर शहर महापालिका प्रशासक तथा आयुक्त यांनी पारदर्शक आणि गतीमान कारभार करण्यासाठी भिवंडी- निजामपूर शहरातील नागरिकांना घरबसल्या तक्रार करण्यासाठी तसेच तक्रार कोणत्या कार्यालयात प्रलंबित आहे याचा आढावा घेण्यासाठी एक क्युआर कोड तयार करुन त्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. याकरिता महापालिकेने grp.bncmc.gov.in या नावाने संकेतस्थळ देखील सुरु केले आहे.
१ एप्रिल रोजी महापालिका मार्फत १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत ‘सुकर जीवनमान' या शिर्षकाखाली नागरिकांच्या सुविधेकरिता स्मार्ट तक्रार निवारण प्रणाली निर्माण करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिका मार्फत प्रसिध्द करण्यात आलेले क्युआर कोड स्टिकर महापालिकेच्या सर्व कार्यालयांबाहेर चिकटवण्यात आले आहेत.
नागरिकांनी महापालिका मार्फत प्रसिध्द करण्यात आलेले क्युआर कोड स्कॅन करुन त्याद्वारे आधी स्वतःची केवळ एकदाच नोंदणी करावयाची आहे. त्यानंतर तक्रारीशी संबंधित विभाग निवडून त्या विभागाबाबत तक्रार नोंदवायची आहे. यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही. तसेच तक्रारदाराने केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा देखील होणार असून, जर संबंधित अधिकाऱ्याने सात दिवसात तक्रार निकाली काढली नाही तर सदरची तक्रार आज्ञा प्रणालीमार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग होणार आहे. याबाबत महापालिका आयुक्त स्वतः प्रत्येक आठवड्याला आढावा घेणार असून, एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी तक्रार प्रलंबित असलेल्या अधिकारी वर्गावर कारवाई प्रस्तावित केली जाईल, असे सुतोवाच आयुक्तांनी केले आहे. - श्रीकांत परदेशी, माहिती आणि जनसंपर्क अधिकारी - भिवंडी-निजामपूर महापालिका.