‘नवी मुंबई विमानतळ'ला ‘दिबां'चेच नाव
भिवंडी : ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ'ला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव लागणार असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून मुख्यमंत्र्यांच्या या सकारात्मक आश्वासनामुळे ६ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळाजवळ होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याची माहिती ‘भिवंडी'चे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी ‘पत्रकार परिषद'द्वारे दिली आहे.
३ ऑवटोबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सर्वपक्षीय कृती समिती'ची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सर्वपक्षीय स्थानिक आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री, भूमीपुत्र उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नवी मुंबई विमानतळ'ला लोकनेते दि. बा. पाटील यांच्याच नावाची शिफारस केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ‘दिबां'च्याच नावाला सकारात्मकता दर्शवली असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीवेळी आपल्याला दिल्याचे खा. सुरेश म्हात्रे यांनी दिली.
विमानतळ नामांतराच्या श्रेय वादात मी पडणार नसून, त्याचे सर्व श्रेय स्थानिक भूमीपुत्रांचे असल्याचे खा. म्हात्रे यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासन आमच्या आंदोलनाच्या विजयाचा फक्त पहिला टप्पा असून ज्या दिवशी खरोखर विमानतळाला दि. बा. पाटील यांंचे नाव लागेल, तोच दिवस आमच्यासाठी जल्लोषाचा असेल, असेही खा. सुरेश म्हात्रे यांनी सांगितले. तसेच जर मुख्यमंत्र्यांनी शब्द पळाला नाही तर अधिक उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील खासदार सुरेश म्हात्रे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
सदर ‘पत्रकार परिषद'प्रसंगी निलेश पाटील, सुशांत पाटील, डॉ. तपन पाटील, प्रा. सागर पाटील, डॉ. गिरीश साळगावकर, सर्वेश तरे, अविनाश सुतार, पुंडलिक वाडेकर, हिरा पाटील यांच्यासह भूमीपुत्र उपस्थित होते.