प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
आंतरराज्यीय एमडी ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (एएनटीएफ) आंतरराज्यीय एमडी ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथे सुरु असलेले एमडी ड्रग्ज तयार करणारे ३ बेकायदेशीर कारखाने उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईत टास्क फोर्सने तब्बल ५५ कोटी ८८ लाख ९० हजार रुपये किंमतीचे एमडी ड्रग्ज आणि त्यासाठी लागणारे साहित्य जप्त करुन २ आरोपींना अटक केली आहे. या कारखान्यांमधून तयार होणारे एमडी ड्रग्ज भारताच्या अनेक राज्यांमध्ये वितरित केले जात असल्याचे उघडकीस आले आहे. या रॅकेटमधील आणखी आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
वाशीतील कारवाईतून उलगडले बंगळूर कनेक्शन...
‘एएनटीएफ'च्या कोकण पथकाने २१ डिसेंबर रोजी मुंबई-पुणे महामार्गावारील वाशीगांव येथे कारवाई करत एमडी ड्रग्ज विक्री करण्यासाठी आलेल्या अब्दुल कादर रशीद शेख याला अटक केली होती. तसेच त्याच्याकडून तब्बल १.४८ कोटी लाख रुपये किंमतीचे १ किलो ४८८ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर ‘एएनटीएफ'च्या पथकाने आरोपी अब्दुल कादर याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे तांत्रिक तपास केला असता, बेळगावचा प्रशांत यल्लापा पाटील एमडी ड्रग्ज तयार करणारा प्रमुख सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. तसेच बंगळुरु येथील ३ कारखान्यांमध्ये एमडी ड्रग्ज तयार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
लोकवस्तीतच एमडी ड्रग्ज कारखाने...
त्यानंतर ‘एएनटीएफ'च्या पथकाने अधिक तपास करत बंगळुरु गाठून सुरज रमेश यादव आणि मालखान रामलाल बिश्नोई या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत बंगळुरु मधील स्पंदना लेआउट कॉलनी, एनजी गोलाहळी येथील आर.जे. इव्हेन्ट नावाची फॅक्टरी, तसेच येरपनाहळी-कन्नूर परिसरातील लोकवस्तीतील आरसीसी घर या ३ ठिकाणी एमडी ड्रग्ज तयार केले जात असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर ‘एएनटीएफ'च्या पथकाने या तिन्ही ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून या कारखान्यातून ४ किलो १०० ग्रॅम घन स्वरुपातील एमडी, १७ किलो द्रव स्वरुपातील एमडी, तसेच एमडी तयार करण्याची यंत्रसामग्री आणि विविध रसायने असा एकूण २१ किलो ४०० ग्रॅम एमडी सह ५५.८८ कोटींचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर एमडी ड्रग्ज तयार करण्यात येत असलेले तीन्ही कारखाने उध्ववस्त केले.
देशभरात पुरवठा, कोट्यवधींची मालमत्ता खरेदी...
प्राथमिक तपासात या कारखान्यांमधून तयार होणारे एमडी ड्रग्ज भारताच्या अनेक राज्यांमध्ये वितरित केले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपींनी एमडी विक्रीतून मिळालेल्या पैशांतून बंगळुरु शहरात मोठया प्रमाणात स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचेही उघड झाले आहे. या रॅकेटमधील महत्त्वाचे २ आरोपी फरार असून त्यांच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आले आहेत. पुणे आणि कोकण कृती गटातील वरिष्ठ अधिकारी आणि अंमलदारांनी सदर संपूर्ण कारवाई अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक (एएनटीएफ) शारदा राऊत, पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
नागरिकांना आवाहन...
आपल्या परिसरात अंमली पदार्थांबाबत कोणतीही गोपनीय माहिती असल्यास नागरिकांनी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र ०७२१८ ००००७३ या हेल्पलाईनवर संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.