अनधिकृत प्ले ग्रुप शाळांवर कारवाईची मागणी

उल्हासनगर : शहरात ‘प्ले ग्रुप'च्या नावाखाली अनेक अनधिकृत शाळा सुरु असून त्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या शाळांचा मालक कोण, त्यांची पार्श्वभूमी काय, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची पात्रता, पार्श्वभूमी कशी याची चौकशी करण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिक आणि ‘मनसे'ने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.

या शाळांमध्ये २ ते ५ वर्षे वयोगटातील लहान मुले शिकत असतात. त्यांना आपले नावसुध्दा नीट सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळा व्यवस्थापनावर आहे. अलिकडेच उल्हासनगरात अडीच वर्षांच्या विद्यार्थ्याला कविता म्हणताना टाळ्या वाजवल्या नाहीत, म्हणून शिक्षिकेने ४ ते ५ थापड मारल्याचा व्हिडिओ समोर आला. सदर घटना निंदनीय असून पालक आणि समाजात चिंतेचे वातावरण आहे.

सदर घटनेत दोषी शिक्षिका इतकीच शाळेच्या मालकाची जबाबदारी ठरते, असे निवेदनात म्हटले आहे. शाळेत सीसीटीव्ही असले तरी त्यावर लक्ष ठेवणे मालकाची जबाबदारी आहे. तसेच शासनाचे स्पष्ट धोरण नसल्याने शहरात गल्लोगल्ली अनधिकृत शाळा चालविल्या जात असून ‘शाळा' या नावाखाली व्यवसाय सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मनसे आणि ‘मनविसे'तर्फे अशा शाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचारी यांची पोलीस पडताळणी बंधनकारक करावी. तसेच मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र घेणे सक्तीचे करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत ‘प्ले ग्रुप'ची नोंदणी करुन संबंधित कागदपत्रे जमा करण्याचे आदेश द्यावेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

एकूणच लहान मुलांच्या सुरक्षिततेशी संबंधित या गंभीर प्रश्नावर तात्काळ कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

टिटवाळा मध्ये ५ लाखांची वीज चोरी