प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
३८ बसथांब्यांसाठी १० कोटींचा खर्च
नवीन पनवेल : पनवेल महापालिका हद्दीत बांधलेल्या ३८ बसथांब्यांचा खर्च १० कोटीहून अधिक असल्याचे माहिती अधिकारात उघड झाली आहे. एका बसथांब्याचा खर्च २६ ते २७ लाख रुपये असल्याने सारे अचंबित झाले आहेत. या ऐवजी महापालिव्ोÀची स्वतःची परिवहन बस सेवा सुरु करायला हवी होती, असे जाणकारांचे मत आहे.
पनवेल महापालिका हद्दीत एकूण ३८ बसथांबे विकसित करण्यात आले आहेत. सदर बसथांबे विकसित करण्याचे कार्यादेश बोरकर पॉलिमर्स यांना देण्यात आले असून प्रति बसथांबा २२ लाख ८९ हजार रुपये (जीएसटी वगळून) एवढा खर्च येत आहे. जीएसटी पकडून जवळपास २६ ते २७ लाख रुपये एका बसथांब्याचा खर्च आहे. पनवेल महापालिका स्थापन होऊन ९ वर्ष उलटून गेली तरी देखील महापालिकेची स्वतःची बस सेवा अस्तित्वात नाही. तब्बल १० कोटी रुपये खर्च करुन फक्त ३८ बसथांबे महापालिका हद्दीत उभारण्यात आले. या ऐवजी पनवेल महापालिकेने स्वतःची परिवहन सेवा सुरू करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता बस थांब्यावर १० कोटी रुपये खर्च करण्यात आला. पनवेल महापालिकाकडून यासाठी शासकीय निधी प्राप्त झाला होता, असे सांगण्यात आले. मात्र, सदर शासकीय निधी इतर ठिकाणी देखील वापरता आला असता. पण, ३८ बस थांब्यांवर या निधीची उधळपट्टी करण्यात आली. बसथांबे जरी आकर्षक दिसत असले तरी देखील ते खराब होण्याचीच भिती जास्त आहे.
पनवेल महापालिकेने जीएसटीसह १० कोटी २७ लाख रुपये खर्च करुन महापालिका हद्दीत ३८ बसथांबे उभारले. मात्र, स्वतःची परिवहन सेवा महापालिकेला सुरु करता आली नाही. ते महापालिकेचे अपयश आहे. पनवेल पालिकाकडून नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी सुरु आहे.
- आदित्य जानोरकर, राष्ट्रवादी युवक (शरदचंद्र पवार गट) काँग्रेस.
पनवेल महापालिका हद्दीत चांगल्या दर्जाचे बस स्टॅन्ड तयार झाले आहेत. त्यासाठी शासकीय निधी प्राप्त झालेला आहे.
-वैभव विधाते, उपायुक्त-पनवेल महापालिका.