सोशल मीडियावरुन शिकला चोरीचे धडे; 21 मोटारसायकल व 5 रिक्षा हस्तगत 

नवी मुंबई : इंटरनेटचा वापर प्रगतीसाठी केला जातो, मात्र याच इंटरनेटचा व सोशल मिडीयाचा वापर करुन गुन्हेगारीचे धडे गिरवणाऱया एका अट्टल टोळीचा नवी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मोटारसायकल आणि रिक्षा चोरी करणाऱया या संघटित टोळीतील चौघांना  मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे. तसेच या टोळीने नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरात केलेले 23 गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिसांनी या टोळीकडुन तब्बल 40 लाख 46 हजार रुपये किमतीचे 21 मोटारसायकल व 5 रिक्षा अशी एकुण 26 वाहने हस्तगत केली आहेत.  

काही दिवसांपूर्वी खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुह्याचा समांतर तपास करताना मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले. या तपासादरम्यान आरोपी हे डोंबिवलीतील कोळेगाव परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेने कोळेगाव परिसरातुन मुख्य सूत्रधार संतोष लक्ष्मण ढोले (45), लक्ष्मण तिपन्ना मासाळकर (34), संजीव गंगाराम सक्सेना (52) व कैलास खेताजी चौधरी (38) या चौघांना अटक केली.  

या टोळीचा मुख्य सूत्रधार संतोष लक्ष्मण ढोले हा सोशल मीडियावर वाहन चोरीचे व्हिडीओ पाहून नवनवीन क्लुप्त्या शिकत होता. तसेच आपल्या साथिदारांच्या मदतीने मोटासायकल व रिक्षांची चोरी करत होता. त्यानंतर संतोष ढोले हा चोरलेल्या वाहनांवर स्वत:च्या नावावर असलेल्या जुन्या गाडच्या नंबर फ्लेट लावत होता. त्यामुळे कोणालाही संशय येत नव्हता. ही गाडी माझ्याच नावावर आहे, असे भासवून तो लोकांची फसवणूक करुन या गाड्या विकत असल्याचे तपासात आढळुन आले आहे.  

पोलिसांनी आरोपींकडून कौशल्यपूर्ण तपास करुन त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणावरुन चोरलेल्या 21 मोटारसायकल, आणि 5 रिक्षा, असा एकुण 40 लाख 46 हजार रुपये किंमतीची वाहने जफ्त केली आहेत. या आरोपींनी नवी मुंबई, ठाणे व मुंबई परिसरातील 18 मोटारसायकल चोरीचे आणि 5 रिक्षा चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. सध्या सर्व आरोपी 6 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत असून, त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी दिली.  
मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार, राहुल भदाणे व इतर कर्मचाऱयांनी अत्यंत चिकाटीने हा तपास पूर्ण केला. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

भंगारच्या नावाखाली ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश ; ७ जण जेरबंद