खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय
कल्याण : केडीएमसी क्षेत्रातील अटाळी, पंपहाऊसकडे जाणारा मुख्य रस्ता, वडवली मुख्य रस्ता आणि आंबिवली रेल्वे स्टेशन बाजारपेठ रस्त्यावर पाणी पुरवठा विभागाने पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम केले होते. त्यावर खडीकरण आणि डांबरीकरण न केल्यामुळे सर्व पादचारी, वाहन चालक यांची गैरसोय होत आहे. दुचाकी गाड्यांवरुन नागरिक पडत आहेत, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून पावसाळ्यात अवस्था गंभीर होऊ शकते. त्यामुळे सदर समस्येकडे ‘आरपीआय'चे भिवंडी लोकसभा सोशल मिडीया-आयटी सेल प्रमुख दीपक संकपाळ यांनी लक्ष वेधले असून याबाबत केडीएमसी आयुक्तांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे वडवली उड्डाणपुल ते अटाळी रेल्वे गेट क्र.४८ दरम्यानचा रस्ता काही महिन्यांपूर्वी माजी नगरसेवक दुर्योधन पाटील आणि हर्षाली थविल यांच्या पाठपुराव्याने नव्याने बनवण्यात आला होता. या रस्त्याची गुणवत्ता उत्तम असून वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेला सदर रस्ता पहिल्यांदाच चांगल्या प्रकारे तयार झाला होता. मात्र, पाणी पुरवठा विभागाच्या बेजबाबदार कामामुळे तो पुन्हा उध्वस्त झाला आहे.
या खोदकामादरम्यान वडवली-अटाळी-आंबिवली भागाला वीज पुरवठा करणारी केबल २ वेळा खराब झाली. एकदा रात्री संपूर्ण परिसर अंधारात गेला आणि दुसऱ्या वेळी १० तास दिवसा वीज बंद राहिली. यामुळे व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले. ‘महावितरण'च्या केबलचे स्थानिक नकाशे घेऊन काम न केल्याने सदर परिस्थिती उद्भवली. याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चितच टाकता येईल. तसेच वार्ड ऑफिसजवळील अपूर्ण खोदकामामुळे काही दिवसांपूर्वी महिलेला अपघात झाला. सुदैवाने गंभीर दुखापत टळली. मात्र, या परिसरात अजुनही खोदलेले रस्ते तसेच खुले खड्डे असल्याने दररोज अपघात घडत आहेत.
सदर संपूर्ण परिस्थितीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. व्यापारी आणि रहिवाशांना आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर ‘आरपीआय'चे भिवंडी लोकसभाप्रमुख दीपक सकपाळ यांनी आम्ही लवकरच
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन पाणी पुरवठा विभागाच्या जलवहिन्या टाकण्याच्या कामामुळे दुरावस्था झालेल्या रस्त्याचे काम मार्गी लावण्याबाबत निवेदन देणार आहोत. संबंधित ठेकेदार आणि महापालिकेतील दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.