तळोजातील लॉजमध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश

नवी मुंबई : तळोजा एमआयडीसी परिसरातील हॉटेल नवनाथ इन लॉजिंग येथे सुरु असलेल्या बेकायदेशीर वेश्याव्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पर्दाफाश करत, अल्पवयीन बांग्लादेशी मुलीची तसेच ६ पीडित महिलांची (त्यापैकी २ बांग्लादेशी) सुटका केली आहे. या कारवाईत ‘एएचटीयू'च्या  पथकाने लॉज मालक, मॅनेजर आणि सर्व्हिस बॉय या तिघांना अटक केली आहे.

तळोजा एमआयडीसी मधील नवनाथ इन लॉज मधील मॅनेजर ग्राहकांकडून २ हजार रुपये घेऊन लॉजमध्ये ठेवण्यात आलेल्या महिलांच्या माध्यमातून देह व्यापार चालवत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी २१ डिसेंबर रोजी रात्री बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. ठरलेल्या सांकेतिक इशाऱ्यानंतर रात्री ११.४५ वाजता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे सहायक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, पोलीस हवालदार अनिल मांडोळे आणि इतर अंमलदारांनी या लॉजवर छापा टाकला.

छाप्यात लॉजमधील खोल्यांमध्ये वेश्यागमनासाठी ७ महिला ठेवण्यात आल्याचे आढळून आल्या. त्यामध्ये एक अल्पवयीन बांग्लादेशी मुलगी असल्याचे उघडकीस आले आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने या सर्व महिलांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली आहे. तसेच लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या वसंत गणेश शेट्टी (लॉज मालक), गिरीश विठ्ठल शेट्टी (लॉज मॅनेजर), रोशन रामजित यादव (सर्व्हिस बॉय) या तिघांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नोकरीच्या नावाखाली ४३ कोटींचा गैरव्यवहार