प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
भाईंदर येथील आगीत ५०पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक
भाईंदर : मिरा रोडच्या प्लेझंट पार्क भागात १४ दिवसांपूर्वी लागलेल्या प्रचंड आगीची धग अजून शांत झाली नसतानाच १० एप्रिल रोजी पुन्हा एकदा मिरा-भाईंदरमध्ये भीषण अग्नितांडवात तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ५०पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. घटनास्थळावरून अग्निशमन दलाच्या जवानांनी २४ सिलिंडरचा जप्त केले असून देशात गॅस तुटवडा असताना झोपडपट्टीत इतका मोठा साठा कुणी आणि का केला? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
भाईंदर पूर्व येथील इंद्रलोक परिसरात शासकीय आरक्षित भूखंडावर पत्र्याचे शेड उभारून झोपडपट्टी उभारण्यात आली आहे. त्याठिकाणी अचानक आग लागल्याची घटना घडली. आणि एका पाठोपाठ एक गॅस सिलेंडरचे स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीची तीव्रता अधिक असल्यामुळे बचावकार्य करण्यास जवानांना तीन तासांहून अधिक काळ प्रयत्नांची शर्त करावी लागली दरम्यान, तीन जणांचे मृतदेह अग्निशमन दलाने बाहेर काढले. मृतदेहांची ओळख पटली असून त्यांची नावे गुड्डू राम (४६), सुरज लियाकत अली (१४), रोहित रहेमत अली (१५) आहेत. गुड्डू उत्तर प्रदेशचा तर सुरज पश्चिम बंगालचा असल्याची माहिती मिळत आहे. तर आगीत ५० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान रात्री उशिरा अग्निशमन दलाच्या ६ गाड्यांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले आहे. कारण समजले नसले तरी देशात गॅस तुटवडा असताना झोपडपट्टीत इतका मोठा साठा कुणी आणि का केला? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.