प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
पनवेल महापालिकेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
पनवेल : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांचा प्रशस्तीपत्र प्रदान समारंभ २८ मार्च रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी प्लस उपक्रमात पनवेल महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत मानाचा बहुमान मिळविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.
राज्यामधील एकूण २९ महापालिकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता. अनेक मोठ्या आणि अनुभवी महापालिका स्पर्धेत असताना पनवेल महापालिकेने आपला झेंडा फडकवला असून याबाबत पनवेलचे विशेष कौतुक होत आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या नेतृत्वात परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे आणि संगणक विभागाचे उपायुक्त स्वरुप खारगे यांच्या टीमने अथक मेहनत करीत सदरचा बहुमान पटकावला आहे. पनवेल महापालिकेने यापूर्वीही १०० दिवसांचा प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमामध्ये चांगली कामगिरी बजावत तिसरा क्रमांक पटकावला होता.
ई-गव्हर्नन्स कार्यक्रम...
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमामधे महापालिकेचे संकेतस्थळ वापरण्यास सुलभ, सुरक्षित, अद्ययावत असणे. महापालिकेचे Dashboard विकसित करणे. आपले सरकार अंतर्गत नागरिकांना विहित वेळेत सुलभतेने सेवा पुरवणे. कार्यालयात eoffice चा प्रभावी वापर करणे;Whatsapp Chatbot चा वापर करणे; एआयचा वापर करणे. जीआयएसचा वापर करणे अशा घटकांचा समावेश होता.
आयुक्त मंगेश चितळे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यावर लगेचच कार्यालयातe office सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे आयुक्तांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या Panvel Connect App द्वारे नागरिकांना सुलभ सेवा प्रदान करता आल्या. याचा मोठ्या प्रमाणात फायदा या स्पर्धेसाठी झाला.
सेवाकर्मी प्लस कार्यक्रम...
कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींच्या सुधारणांकरिता १५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रमामध्ये संपूर्ण राज्यातून २९ महापालिकांचा सहभाग होता. या सर्व महापालिकांमधून एकच क्रमांक काढण्यात आला असून तो पनवेल महापालिकेने पटकाविला.
सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याकरिता सेवाविषयक बाबींच्या गुणांकनाचा सेवाकर्मी कार्यक्रमामध्ये आकृतिबंध मंजूर असणे, सेवाप्रवेश नियम मंजूर असणे, सेवाज्येष्ठता अद्ययावत करुन प्रसिध्द करणे, पदोन्नती पदांची स्थिती, सरळसेवा पदांची स्थिती, बिंदुनामवाली प्रमाणित असणे, अनुकंपा नियुक्त्या, iGOT रजिस्ट्रेशन-प्रशिक्षण, सेवापुस्तक अद्ययावत करणे अशा ९ मुद्द्यांवर आधारित मूल्यांकन झाले होते. यामध्ये १०० पैकी ९६ गुण घेऊन पनवेल महारपालिकेने बाजी मारली आहे.
तत्कालीन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या दूरदृष्टीने त्यावेळी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्याचा विशेष फायदा या स्पर्धेसाठी झाला. आयुक्त मंगेश चितळे यांनी आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी जसे की सेवाजेष्ठता यादी, आश्वासित प्रगती योजना राबविणे, पदोन्नती देणे आणि भरती प्रक्रिया पार पाडणे यास प्राधान्य दिले. अशा बाबींमुळे सेवाकर्मी स्पर्धेत फायदा झाला.
सदर घटकांचे सादरीकरण १० जानेवारी रोजी महापालिकेने सादर केले होते. या स्पर्धेचे मूल्यांकन Quality Council Of India (QCI) या राष्ट्रीय संस्थेने पारदर्शकपणे केले होते.
सदर पुरस्कार प्रशस्तीपत्र वितरण समारंभावेळी प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या कार्यालय प्रमुखांना कार्याचे सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली होती. यावेळी पनवेल महापालिकेने केलेल्या सादरीकरणाची उपस्थितांनी प्रशंसा केली. तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांची प्रेरणा आणि आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त स्वरुप खारगे यांच्या नेतृत्वाखाली संगणक विभागप्रमुख वर्षा पालवे, दिशा टाक आणि कर्मचारी यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली.
पनवेल महापालिकेने मिळवलेले सदरचे यश केवळ क्रमांकापुरते मर्यादित नसून प्रशासनातील पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नागरिकाभिमुख सेवांचा परिणाम आहे. या यशामागे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे समन्वय, परिश्रम आणि बांधिलकी आहे. भविष्यातही याच दिशेने अधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पनवेल महारपालिका राज्यात आदर्श ठरेल, असा विश्वास आहे.
-मंगेश चितळे, आयुक्त-पनवेल महापालिका.