वीजभार वाढीच्या ऑनलाईन अर्जांना स्वयंचलित मंजुरी
मुंबई : ‘महावितरण'च्या लघुदाब वर्गवारीतील सर्व औद्योगिक, व्यावसायिक, घरगुती आणि इतर ग्राहकांच्या १५७ केडब्लू पर्यंत वीज भार वाढीच्या ऑनलाईन अर्जांना ‘महावितरण'कडून स्वयंचलित पध्दतीने मंजुरी देण्यास प्रारंभ झाला आहे. ‘महावितरण'च्या संकेतस्थळावर सदर स्वयंचलित प्रणाली कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे पायाभूत यंत्रणा उभारण्याची गरज नाही अशा ठिकाणी ग्राहकांनी नियमानुसार शुल्काचा भरणा केल्यानंतर केवळ २४ ते ४८ तासांमध्ये मागणीप्रमाणे वाढीव वीजभार स्वयंचलित पध्दतीने मंजूर आणि कार्यान्वित होणार आहे.
मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीजग्राहकांना ‘इज ऑफ लिव्हिंग'नुसार (राहणीमान सुलभता) सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार ‘महावितरण'चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी लघुदाब वर्गवारीतील सर्व ग्राहकांसाठी वीज भारात वाढ किंवा कमी करण्याची प्रक्रिया ऑनलाईनद्वारे स्वयंचलित करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसीत करुन १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरच्या सेवा पर्वाचे औचित्य साधून सदर सुविधा सुरू करण्यात आली आहे.
सध्या अस्तित्त्वात असलेल्या जोडणीच्या वीजभारामध्ये (लोड चेंज/डिमांड चेंज) करारापेक्षा आणखी वाढ करणे किंवा कमी करण्याची सोय महावितरणच्या ैैै.स्ीप्ी्ग्ेम्दस्.ग्ह संकेतस्थळावर किंवा मोबाईल ॲपवर ग्राहकांना स्वतःच्या लॉगीनद्वारे उपलब्ध आहे. मात्र, मंजुरीची प्रक्रिया स्वयंचलित नसल्याने पुढील कार्यवाहीसाठी बराच वेळ लागत होता. आता १५७ किलोवॅट पर्यंतच्या वीज भाराच्या वाढीसाठी स्वयंचलित मंजुरी देण्यात येणार आहे. वीज भार वाढीबाबत ऑनलाईन मागणी नोंदविल्यानतंर संबंधित ग्राहकांना स्वयंचलित पध्दतीने कोटेशन देण्यात येईल. तर कोटेशनचे शुल्क भरण्याची देखील ऑनलाइन सोय आहे.
लघुदाब वर्गवारीमध्ये शून्य ते ७.५ किलोवॅट, ७.५ ते २० किलोवॅट आणि २० ते १५७ किलोवॅट असे वीजभाराचे तीन गट आहेत. या तिनही गटात वीज भार वाढीच्या मंजुरीसाठी स्वयंचलित प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ग्राहकांना केवळ संकेतस्थळ किंवा मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागेल आणि नियमानुसार शुल्क भऱावे लागेल. त्यापुढील सर्व प्रक्रिया ‘महावितरण'कडून स्वयंचलित पध्दतीने होणार आहे. त्याची माहिती संबंधित ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा ई-मेलद्वारे कळविण्यात येणार आहे.
वीजग्राहकांनी आवश्यक शुल्काचा भरणा केल्यानंतर नवीन मीटर बसविण्याची किंवा पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याची गरज नसेल अशा नसेल, अशा वीजजोडणीचा वाढीव वीज भार स्वयंचलित प्रणालीने मंजूर होईल आणि केवळ २४ तासांत कार्यान्वित होईल. वाढीव वीजभाराच्या आवश्यकतेनुसार किंवा सिंगलऐवजी थ्री फेजची मागणी असल्यास नवीन मीटर लावण्यात येते. अशा ठिकाणी नवीन वीज मीटर लावण्याचा आदेश स्वयंचलितपणे संबंधित एजन्सीला देण्यात येईल. त्यामुळे नवीन वीजमीटरची आवश्यकता असलेल्या ठिकाणी देखील साधारणतः ४८ तासांमध्ये वीज भार वाढीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यासह ज्या वीजजोडणीचा करारापेक्षा अधिक वीज भार वाढविण्यासाठी पायाभूत यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे, त्याठिकाणी महावितरणद्वारे पायाभूत यंत्रणा उभारण्यात येईल.