नवी मुंबई महापालिका शाळांमधील  शालेय गणवेश वाटपासाठी होत असणाऱ्या विलंबाविरोधात मनसे ऍक्शन मोडवर 

नवी मुंबई : मागील दोन वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटपासाठी विलंब होत आहे  मे.मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला नवी मुंबई महापालिकेने ३० ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या कार्यादेशानुसार संबंधित कंत्राटदारास २०२४/२५ आणि २०२५\२६ या वर्षाकरिता नवी मुंबई महापालिकेतील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटपाचे कंत्राट देण्यात आले आहे तरी संबंधित कंत्राटदाराने अद्यापपर्यंत शाळेतील मुलांना त्यांच्या हक्काच्या गणवेशापासून वंचित ठेवले आहे. मागील वर्षी शैक्षणिक वर्ष २०२४/२५ साठी सदर कंत्राटदाराने गणवेश वाटपासाठी जानेवारी २०२५ पर्यंत २१० दिवस विलंब केला असताना देखील त्याला निविदापत्रानुसार विहित वेळेत गणवेश पुरवठा न केल्यामुळे काळया यादीत का टाकले नाही? असा सवाल मनसे विद्यार्थी सेनाने उपस्थित केला आहे.

शालेय गणवेश वाटपासाठी सतत विलंब करत असताना देखील सदर कंत्राटदारावर महापालिका शिक्षण विभाग कोणतीही दंडात्मक कारवाई करताना आमच्या निदर्शनास आले नाही यावरून उलट महापालिका अधिकारी आणि सदर कंत्राटदाराचे काही साटेलोटे आहे का? असेही मनसेने म्हटले आहे.

या वर्षी २०२५/२६ ला देखील गणवेश वाटपासाठी काढलेल्या निविदेमधील अटी शर्तीनुसार शाळा सुरू झाल्यानंतर ९० दिवसाच्या आत विद्यार्थ्यांना गणवेश देणे बंधनकारक असतानाही आज जवळपास १२० दिवस उलटले तरी विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहावे लागत आहे तरी संबंधित कंत्राटदारास निविदेमधील अटी शर्तीनुसार योग्य तो दंड आकारून त्याचे कंत्राट तात्काळ रद्द करून त्याला काळया यादी टाकावे आणि गणवेषपासून वंचित विद्यार्थ्यांना येत्या सात दिवसाच्या आत गणवेश उपलब्ध करून द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहर अध्यक्ष संदेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्तांकडे केली. तसेच पुढील ७ दिवसात सदर कंत्राटदाराने उर्वरित सर्व शाळांमध्ये गणवेश पुरवठा न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला.

या वेळेस उपशहर अध्यक्ष  श्रेयस शिंदे,सहसचिव मधुर कोळी, विपुल पाटील,विभाग अध्यक्ष प्रद्युम्न हेगडे, सोनू वाघमारे,चेतन कराळे व इतर मनविसे पदाधिकारी उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

श्री सदस्यांसह ७ हजार नागरिकांकडून महामार्गावर महास्वच्छता