उरण पूर्व विभागात वीज पुरवठा वारंवार खंडीत
उरण : उरण तालुक्यातील पूर्व विभागात विजेचा लपंडाव सुरु असल्याने उरण परिसरातील नागरिक कमालीचे हैराण झाले असून तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. त्याचप्रमाणे देखभाल-दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद करुनही वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे.
उरण पूर्व विभागात वारंवार विजेचा खेळखंडोबा पाहायला मिळत आहे. विद्युत पुरवठा खंडीत का झाला? अशी विचारणा नागरिकांनी केल्यावर ‘महावितरण'च्या कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडून नागरिकांना उत्तरच मिळत नाहीत.त्याचप्रमाणे ‘महावितरण'चे कर्मचारी एक तर फोन बंद करुन बसत आहेत. आणि जरी संपर्क झाला तरी फोन देखील उचलायची तसदी घेत नाही आहेत, अशी तक्रार नागरिक करीत आहेत. उरण शहर आणि परिसरात विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार दररोजचे आहेत.
गेल्या काही दिवसांपासून उरण तालुक्यातील सारडे, वशेणी पुनाडे गावे अंधारात आहेत. कोणतेही कारण न देता उरण पूर्व विभाग आणि इतर विविध भागात वीजप्रवाह खंडीत करण्याचे प्रकार ‘महावितरण'कडून वारंवार होत आहेत. आठवड्यातून मंगळवारी किंवा कधी कधी शुक्रवारी एकदा देखभाल-दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडीत केला जात असताना, इतर दिवशीहीी दिवस- रात्र, सकाळ-संध्याकाळ कधीही वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने, नागरिकांमधून ‘महावितरण'च्या व्यवस्थापनाबाबत संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात खाजगी गोडाऊन आहेत. त्याचप्रमाणे विविध कंपन्या देखील आहेत. नागरिकांची गावाखेड्यातील वीज खंडीत झाली, तरी या कंपन्यांची वीज मात्र जशीच्या तशी असते. सर्वसामान्य नागरिकांची आबाळ करुन विजेचा लोड, खाजगी गोडाऊनला देण्यात येत असल्याने त्याचा परिणाम संपूर्ण तालुक्याच्या विजेवर होत आहे, असा नागरिकांचा महावितरणावर आरोप होत आहे. ‘महावितरण'कडे तक्रार दाखल करुनही फारसा फरक न पडल्याने नागरिक भरडले जात आहेत.
दिवस-रात्र, सकाळ-संध्याकाळ कधीही वीज जात असल्यामुळे त्याचा परिणाम आमच्या दैनंदिन आयुष्यावर होत आहे. शाळेत जाणारी मुले असून त्यांच्या अभ्यासावर देखील या वीज समस्येचा परिणाम होत आहेत. याप्रकरणी ‘महावितरण'च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे संपर्क साधला असता, त्यांच्याकडून मात्र फोन उचलले जात नाहीत.
-अनंत ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते, खोपटे.