गणेश घाटात घाणीचे साम्राज्य

भिवंडी : भिवंडी शहरात गेल्या अनेक वर्षांपासून गणेश घाटांची सफाई पावसाळ्यानंतर गणेशोत्सवाच्या काही दिवस अगोदर केली जात होती. त्यामुळे गणेशघाट योग्यरीत्या साफ न होता गणेशमूर्ती विसर्जनास अडथळा येत होता. मात्र, सध्या या गणेश घाटांवर घाणीचे साम्राज्य पसरल्याने शहरातील गणेशभक्तांकडून गणेश घाट सफाईची मागणी वाढली आहे.

भिवंडी शहरातील मध्यवर्ती भागातील आणि नवीन वसाहतीमधील लहान-मोठ्या गणेशमुर्ती वर्षानुवर्षाच्या परंपरेनुसार शहरालगतच्या कामवारी नदीमध्ये विसर्जित केल्या जात आहेत. मात्र, शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील गणेशमूर्ती जवळच्या तळ्यांमध्ये विसर्जित केली जात होती. काही वर्षांपासून शहराजवळील ग्रामीण भाग भिवंडी महापालिकेत समाविष्ट झाल्याने तळे साफ करण्याची जबाबदारी पर्यायाने महापालिकेकडे आली. तसेच नवीन वसाहतीमुळे गणेशमुर्तींची संख्या वाढल्याने सार्वजनिक तळे वेळीच साफ करणे जरुरी बनले आहे.

भिवंडी देखील तळ्यांचे शहर होते. परंतु, येथे कामधंद्यासाठी आलेल्या लोकांनी काही तळ्यात मातीचा भराव करीत तळे बुजवून अतिक्रमण केले. तर काही तलावांमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण करीत विकासात्मक योजना राबविल्या. त्यामुळे सध्या महापालिका क्षेत्रात तलावाची संख्या कमी झाली. आजच्या घडीला शहरात वऱ्हाळादेवी तलाव एकमेव मोठे तलाव असून त्याच्या भोवताली लोकवस्ती वाढल्याने तेथे वऱ्हाळादेवी, कामतघर आणि फेणे असे तीन गणेश घाट बांधलेले आहेत. या तिन्ही गणेशघाटाबाहेर आणि घाटातील पाण्यात मोठ्या प्रमाणात घाण साचली असून दुर्गंधी पसरली आहे. तसेच मूळ वऱ्हाळा तलावातील पाणी प्रदुषित होऊ नये म्हणून दोन्ही पाण्याच्या दरम्यान खडकाची भिंत बांधलेली होती. केंद्र सरकारच्या निधीतून पर्यावरणाला अनुसरुन घाटाचे पाणी आणि वऱ्हाळा तलावातील पाणी या दरम्यानची बांधलेली भिंत देखील काही ठिकाणी कोसळली आहे. त्यामुळे पर्यावरणाचा आणि पाणी प्रदुषणाचा मूळ हेतू स्वच्छता विभाग, पर्यावरण विभाग आणि पाणी  पुरवठा विभागामुळे निकाली निघाला आहे. त्यामुळे गणेश घाटाची सफाई करताना सदर भिंत देखील पुन्हा उभारावी आणि आणि गणेश घाटाची अंतर्बाह्य सफाई करावी,  अशी मागणी कामतघर, ताडाली, फेणे पद्मानगर, धामणकरनाका, नारपोली आणि कणेरी या भागातील गणेशभक्तांनी केली आहे.

भिवंडी महापालिकेने पावसाळ्याअगोदर वऱ्हाळा तलावातील  कामतघर, फेणे आणि वऱ्हाळा तलाव गणेश घाटाची साफसफाई केली तर गणेशभक्तांना मुर्त्यांचे विसर्जन करताना अडथळे निर्माण होणार नाही. पावसाचे पाणी साचल्यानंतर तलावातील घाण पूर्णपणे काढता येत नाही. त्यासाठी महापालिका स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागाने पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करावी.
-विशाल पाठारे, भाजपा सरचिटणीस, भिवंडी.
             
भिवंडीत प्रामुख्याने कामतघर येथील वऱ्हाळा तलावातील गणेशघाट, फेणे घाट, कामतघर घाट या तीन घाटासह नारपोली आणि चावींद्रा तलाव येथे मोठ्या संख्येने गणेशमुर्तींचे विसर्जन होते. नागरिकांच्या मागणीनुसार या तलावांच्या सफाईचे टेंडर मागविले आहेत. पावसाळ्यापूर्वी १५ जूनपर्यंत या तलावातील गाळ काढून ते साफ करण्यात येतील.
-संदीप पटनावर, कार्यकारी अभियंता-भिवंडी महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई मध्ये एज्युकेशन सिटी