न्यायालय परिसरात सुरक्षिततेचा अभाव
अंबरनाथ : अंबरनाथ येथील चिखलोली न्यायालय परिसरामध्ये विकासकामे सुरु असताना, सुरक्षा उपायांची कमतरता अधोरेखित करणारी घडली आहे. विकासकामांसाठी खोदलेल्या उघड्या खड्ड्यात एक श्वान (कुत्रा) पडला. यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर त्या श्वानाला सुखरूप बाहेर काढले. या घटनेमुळे कामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षितता ठेवणे किती आवश्यक आहे, असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नुकतेच उद्घाटन झालेल्या चिखलोली न्यायालय परिसरात सध्या विविध विकासकामे वेगाने सुरु आहेत. कामाच्या ओघात अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहेत. मात्र, या खड्ड्यांच्या भोवती संरक्षक कठडे (बॅरिकेटस्) किंवा इशारे देणारे फलक लावलेले नसल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. २ ऑवटोबर रोजी सकाळी ९ ते ९.३० च्या सुमारास, याच कारणामुळे एक श्वान या खड्ड्यात पडल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.
खड्ड्यात पडलेला श्वान ओरडत असल्याचे ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली. माणुसकीच्या भावनेतून जमा झालेल्या नागरिकांनी एकत्र येत श्वानाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अखेर दोन तासांच्या परिश्रमानंतर श्वानाला कोणतीही मोठी इजा न होता सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. या उघड्या खड्ड्यांमध्ये श्वान पडला; पण या ठिकाणी जर एखादे लहान मूल किंवा वृध्द नागरिक पडले असते, तर मोठा अपघात होऊ शकला असता, अशी भिती नागरिकांनी व्यक्त केली. त्यामुळे विकासकामे करणाऱ्या संबंधित यंत्रणेने सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि खोदलेल्या खड्ड्यांभोवती त्वरित आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.