८ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईतून विमानोड्डाण
नवी मुंबई : नवी मुंबईतून विमानोड्डाणाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी मुंबईतून विमानोड्डाण करण्यासाठी सिडकोसोबत एनएमआयएएलची लगबग सुरु झाली आहे. त्यामुळे विमानतळाच्या उद्घाटनाची नवी मुंबईकरांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासोबतच मुंबईतील एमएमआरसीएलच्या मेट्रो लाईन-३ चे व एमएमआरडीए द्वारा उभारण्यात आलेल्या मेट्रो लाईन-२-बीचे उद्घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या या दौऱ्याची आखणी अंतिम टफ्फ्यात असून सिडकोसह एमएमआरडीए व्यवस्थापन आपआपल्या प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या तयारीला लागले आहेत. त्याकरिता बैठकांचे सत्र गुरुवारपासून सुरु झाले आहे. सद्यस्थितीत एमएमआरसीएलची मेट्रो लाईन-३ ही बीकेसी ते आरे पर्यंत धावत आहे. मात्र आता उद्घाटनानंतर ही मेट्रो लाईन कुलाबा ते बीकेसी अशी 35 किलोमीटर धावणार आहे. तर मेट्रो लाईन-२-बी ही मंडाले ते डायमंड नगर या दरम्यान धावणार असून या मार्गावर अवघे चार मेट्रो स्थानके असणार आहेत.
विशेष म्हणजे एअर इंडिया समुहाने नवी मुंबई विमानतळावरुन एअर इंडिया एक्सप्रेसची २० उड्डाणे होणार असल्याचे नुकतीच जाहीर केले आहे. देशातील १५ शहरांना या विमानतसेवेद्वारे जोडले जाणार आहे. भविष्यात एअर इंडिया समूहाचा या विमानतळावरुन ५५ ते ६० उड्डाणे करण्याचा मानस आहे.
दरम्यान, नवी मुंबईतून विमानोड्डाणाच्या मुहूर्ताची गत ९ महिन्यांपासून तारीख पे तारीख पडत होती. नवी मुंबई विमानतळ टर्मिनल-१चे काम वॉर फुटींगवर सुरू असून तब्बल १३ हजार कामगार विमानतळ प्रकल्पस्थळी काम करत आहेत. त्यामुळे फक्त देशांतर्गत (डोमेस्टिक) विमान उडवण्याऐवजी परदेशांतर्गत (इंटरनॅशनल) विमानसेवा देखील एकाच वेळेस सुरू करण्याचा मानस अदानी सुमूह व केंद्र सरकारच्या स्तरावर घेतला गेल्याचे बोलले जाते.
नवी मुंबई विमानतळ प्रकल्प हा नवी मुंबई आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी वाहतूक आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे. सदर विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाची कनेक्टिव्हिटी आणि व्यापार वाढीच्या नव्या संधी महाराष्ट्रासाठी व या देशासाठी निर्माण होणार आहेत.
देशातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ म्हणून नावारुपास येणार आहे. यासाठी ३७मेगा वॅट ग्रीन एनर्जीचा वापर केला जाणार आहे. तसेच चारी बाजूने या विमानतळाला कनेक्टिव्हीटी प्राफ्त असून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळापेक्षा या विमानतळाची जास्त क्षमता आहे. विमानतळाच्या २ रनवेचे काम पूर्ण झाल्यानंतर वर्षाकाठी २ कोटी प्रवासी येथून ये-जा करु शकणार आहेत.
विमानतळाच्या नामकरणाचे घोंगडे भिजत
विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्याबाबत देखिल पाठपुरावा सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विमानतळ स्थळाला दिलेल्या भेटीदरम्यान वक्तव्य केले होते. मात्र नामकरणाबाबत राज्य सरकारने साधलेली चुप्पी दि. बा. प्रेमींच्या सहनशिलतेचा अंत पाहत असल्याचे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे.